मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – विरोधकांनी उपस्थित केलेल्या सूत्रावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एम्.पी.एस्.सी.’ची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होईल. त्यानंतर तात्काळ या जागा भरण्याचा निर्णय घेऊन जागा भरल्या जातील’, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वप्नील लोणकर या ‘एम्.पी.एस्.सी.’ उमेदवाराच्या आत्महत्येचे पडसाद ५ जुलै या दिवशी विधानसभेत उमटले. स्वप्नील याची आत्महत्या आणि ‘एम्.पी.एस्.सी.’चे सूत्र विरोधकांनी सभागृहात जोरदारपणे लावून धरले.
१. ‘एम्.पी.एस्.सी.’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुणे येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास लावून नुकतीच आत्महत्या केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचे सूत्र उपस्थित करत सरकारला खडसावले, तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नील याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे साहाय्य करण्याची मागणी केली. याविषयी अजित पवार म्हणाले की, सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे.
२. परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० या दिवशी लागला. ‘एस्.सी.बी.सी’ प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला ९ सप्टेंबर २०२० या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. याच काळात कोरोनाच्या साथीमुळे ‘एम्.पी.एस्.सी.’ आयोगाने परीक्षा रहित केल्या. आयोगाला स्वायतत्ता दिलेली असली, तरी रिक्त जागा भरत असतांना आयोगाच्या अध्यक्षांना बोलावून त्यांच्यासमवेत मुलांच्या मनात निर्माण झालेली भावना दूर करण्यासाठी चर्चा केली जाईल.
३. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला. ‘स्वायत्तता दिलेली असली, तरी अशा प्रकारचा निर्णय घेणे योग्य नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितले. राज्य सरकारप्रमाणे तिन्ही श्रेणीतील भरतींना अनुमती दिली आहे. त्या संदर्भात ‘एम्.पी.एस्.सी.’ने लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे; पण यामध्ये राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल. त्यासंदर्भात आजच सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर बैठक घ्यायला मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.