तेलंगाणा राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबातील एका सदस्याला शासन देणार १० लाख रुपये !

  • लोकशाहीमध्ये अशा प्रकारे करदात्यांचे पैसे केवळ जातीच्या आधारे वाटण्याचा सरकारला काय अधिकार ? जर या जातीमध्ये कुणी आर्थिक सधन असतील, तर त्यांनाही पैसे देणार का ?
  • सरकारकडे पैसे अधिक असतील, तर त्याने नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशाची आरोग्य व्यवस्था किती गचाळ आहे, हे कोरोनाच्या काळात जगासमोर आलेले आहे. ती सुधारण्यासाठी सरकारने पैसे खर्च केले पाहिजेत !
  • एखाद्या समाजाची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी पैसे देण्यापेक्षा त्यांना रोजगार का उपलब्ध करून देत नाही ? कर्ज म्हणून अल्प व्याजावर पैसे का देत नाही ?
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबातील एका व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये राज्यशासनाकडून १० लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. या योजनेसाठी सध्या १ सहस्र २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री दलित अधिकारिता कार्यक्रम’ असे असणार आहे. राज्यातील दलितांची आर्थिक स्थिती भक्कम करून त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ११ सहस्र ९०० कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील १०० कुटुंबांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. तेलंगाणात विधानसभेचे ११९ मतदारसंघ आहेत.