आतंकवादी कारवायांसाठी ड्रोनच्या होणार्‍या वापराकडे गांभीर्याने पाहून त्याला रोखणे आवश्यक !

संयुक्त राष्ट्रांत भारताने मांडले आतंकवाद्यांकडून होणार्‍या ड्रोनच्या वापराचे सूत्र !

न्यूयॉर्क (अमेरिका) – संरक्षण आणि संपत्ती यांच्या विरोधात होणार्‍या शस्त्रसज्ज ड्रोनच्या वापराविषयी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आतंकवादी सीमेपलीकडून शस्त्रांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचे पहाणीतून समोर आले आहे. आतंकवादी कारवायांसाठी ड्रोनच्या होणार्‍या वापराला गांभीर्याने घेतले नाही, तर भविष्यात त्यावर लगाम लावणे कठीण होऊ शकते, अशा शब्दांत भारताने येथे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सूत्र मांडले.

संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांतील आतंकवादविरोधी यंत्रणांच्या प्रमुखांच्या दुसर्‍या उच्चस्तरीय संमेलनात भारताच्या गृहमंत्रालयाचे विशेष सचिव व्ही.एस्.के. कौमुदी यांनी हा विषय मांडला. ते पुढे म्हणाले की, आज इंटरनेट आणि सामाजिक माध्यमे यांचा दुरुपयोग आतंकवादाचा प्रसार आणि आतंकवाद्यांच्या भरतीसाठी केला जात आहे. त्यातच आता ड्रोनचा वापर होत आहे. अल्प खर्चामध्ये ड्रोनचा वापर करता येऊ शकतो आणि तो सहजही उपलब्ध होतो. याच्या माध्यमातून शस्त्रे आणि स्फोटके एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी पोचवली जात आहेत. हे जगासाठी एक मोठे आव्हान आहे.