आनंदी, व्यासंगी आणि अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेले ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. विलास भिडे (वय ७४ वर्षे) !

२६.५.२०२१ या दिवशी पुणे येथील साधक विलास भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. २६.६.२०२१ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी, मुलगी आणि बहीण यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. विलास भिडे

१. श्रीमती वर्षा भिडे (पत्नी) (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे

१ अ. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व : ‘माझ्या यजमानांमध्ये अनेक गुणांचा समुच्चय होता. ते सतत उत्साही आणि आनंदी असत. ‘प्रेमभाव’ आणि ‘दुसर्‍यांचा विचार करणे’, या गुणांमुळे ते सर्वांना साहाय्य करण्यास तत्पर असत. ते काटकसरी आणि उद्योगशील होते. वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्ती विविध विषयांवर त्यांचा सल्ला घेत, उदा. व्यावहारिक अडचणी, आध्यात्मिक मार्गदर्शन, औद्योगिक सुरक्षा, प्रथमोपचार, अग्नीशमन, कंपनीतून ‘व्ही.आर्.एस्.’ (स्वेच्छा निवृत्ती) घ्यावी का ? या अशा लहान-मोठ्या प्रश्‍नांसाठी अनेक जण त्यांचे साहाय्य घेत. त्यांनी अनेक वेगवेगळ्या पदांवर दायित्व घेऊन काम केले आहे. त्यांच्या नीतीने वागण्यामुळे त्यांनी सर्वांचा विश्‍वास संपादन केला होता.

श्रीमती वर्षा भिडे

१ आ. नीटनेटकेपणा : ते घरातील वेगवेगळ्या विषयांच्या आणि विद्यालयाच्या धारिका (फाईल्स) विषयवार नावे लिहून ठेवत.

१ इ. संगीत आणि अभिनय यांची आवड : त्यांना संगीताची आवड होती. ते पेटी, तबला, बासरी, तसेच ‘माऊथ ऑर्गन’, ही वाद्ये वाजवायचे. ते नाटकांमध्ये उत्तम अभिनयही करायचे. ते राज्य नाट्यस्पर्धेत भाग घेत असत. ते नाटकांचे दिग्दर्शनही करत.

१ ई. अभ्यासू वृत्ती : ते पूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात ‘औद्योगिक सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान द्यायचे. ते विद्यार्थ्यांचे आवडते होते. ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे. स्वतःकडील ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांची धडपड असे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायला आवडत असे. त्यांनी वर्ष २०२० मध्ये लागू केलेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत सर्वांना उपयोगी अशा प्राचीन ‘शिवस्वरोदय शास्त्रा’चा अभ्यास केला आणि त्यावर लेख लिहिले. ‘ज्यांना या शास्त्राचा अभ्यास करणे जमणार नाही, त्यांनाही या शास्त्राचा उपयोग करून घेता यावा’, यासाठी त्यांनी त्या लेखांत काही सूत्रे लिहिली होती.

१ उ. इतरांना नवीन गोष्टी शिकवून साहाय्य करणे : ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे सकळ जन ॥’ अशी त्यांची वृत्ती होती. अधिकोषात अग्नीशमनासाठी ‘कार्बन डायऑक्साईड’चा ‘सिलिंडर’ लावलेला असतो. ‘तो कसा वापरायचा ?’, हे सर्वांना ठाऊक नसते. यजमान कधी अधिकोषात गेल्यावर तेथील व्यवस्थापकांना विषय सांगून सर्व कर्मचार्‍यांना एकत्र करायचे आणि ‘तो ‘सिलिंडर’ कसा वापरायचा ?’, याचे प्रशिक्षण द्यायचे. त्याची मुदत संपली असेल, तर त्याची तेथील कर्मचार्‍यांना आठवणही करून द्यायचे.

१ ऊ. त्यांचे सर्व व्यवहार पारदर्शी असत. ते घरातील सर्वांना सांगून आणि विश्‍वासात घेऊन प्रत्येक निर्णय घ्यायचे.

१ ए. ‘मी सनातन संस्थेचा साधक आहे’, असे गौरवाने सांगणे : यजमानांमध्ये असलेली सामाजिक बांधिलकी आणि त्यांची निःस्वार्थ सेवा पाहून २६.१.२०१६ या दिवशी सामाजिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक सुरक्षा या क्षेत्रांतील कौतुकास्पद कामगिरीसाठी पुणे महानगरपालिकेने त्यांचा सन्मान करून त्यांना गौरवपदक दिले. त्या वेळी स्वतःच्या माहितीचे निवेदन भरतांना सर्वप्रथम त्यांनी ‘मी सनातन संस्थेचा साधक आहे’, असे लिहिले होते. वर्ष १९९७-९८ मध्ये ‘पाताळगंगा रोटरी क्लब’चे अध्यक्ष असतांना उत्तम कामगिरीसाठी त्यांचा गौरव करण्यात आला होता.

१ ऐ. उत्साहाने आणि उत्तम प्रकारे सेवा करणे : मनमिळाऊपणा, योग्य निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, सभाधीटपणा, नियोजनकौशल्य आणि संघटनकौशल्य या गुणांमुळे ते वेगवेगळे कार्यक्रम ठरवून ते उत्तम प्रकारे पार पाडत.

१. ते लहान मुलांमध्ये पुष्कळ रमत. त्यांनी घरी २ वर्षे बालसंस्कारवर्ग घेतला होता. ते उन्हाळ्याच्या सुटीत होणार्‍या बालसंस्कार शिबिरात उत्साहाने सेवा करत.

२. एका वर्षी त्यांनी रसायनी, जिल्हा रायगड येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे दायित्व घेऊन ते उत्तम प्रकारे पार पाडले.

३. गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि प्रसारफेरी यांत ते उत्साहाने सेवा करत.

१ ओ. यजमानांचे आजारपण आणि त्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा

१ ओ १. जंतूसंसर्ग होऊन अशक्तपणा येणे : जानेवारी २०२१ मध्ये यजमान पुष्कळ रुग्णाईत झाले. त्यांना जंतूसंसर्ग (व्हायरल इन्फेक्शन) झाला होता. त्यामुळे त्यांच्या स्नायूंवर परिणाम झाला. त्यांच्या शरिरातील ‘सोडियम’चे प्रमाण न्यून झाले. शरिरातील सोडियमचे प्रमाण न्यून झाल्यावर इतरांना जेवढे त्रास होतात, त्यापेक्षा यजमानांना अल्प त्रास झाले. एवढ्या अशक्तपणातही ते आवश्यक तेवढे उठू शकत होते. केवढी ही गुरुकृपा !

१ ओ २. गुरुदेवांना प्रार्थना करताच शारीरिक बळ मिळून यजमानांची सेवा करता येणे : माझा मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नात यजमानांसाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत होते. मला अनेक वर्षांपासून हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे व्याधी असल्यामुळे माझी शारीरिक क्षमता अल्प होती. त्यामुळे मी गुरुदेवांना आत्मनिवेदन आणि प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, यजमानांना तुमच्या चरणांवर ठेवले आहे. तुम्हीच त्यांची काळजी घेणार आहात. मला शारीरिक आणि मानसिक बळही तुम्हीच देणार आहात. गुरुदेवा, मला त्यांची सेवा करायची आहे.’ गुरुदेवांनी माझी हाक ऐकली. त्यांनी मला बळ दिले आणि माझ्याकडून यजमानांची सेवा करवून घेतली. मला यजमानांच्या सेवेतून पुष्कळ आनंद मिळत होता. काही दिवसांनी यजमानांची प्रकृती चांगली झाली आणि मी रुग्णाईत झाले. माझ्या या आजारपणात यजमानांनी माझी पुष्कळ सेवा केली. त्यातून ‘देवाने माझ्याशी असलेला त्यांचा देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करून घेतला’, असे मला वाटले.

१ औ. निधनापूर्वी १५ – २० दिवस आधी यजमानांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना करून आत्मनिवेदन करणे : यजमानांचे निधन होण्यापूर्वी १५ – २० दिवस आधी त्यांनी मला सांगितले, ‘‘मी परात्पर गुरुदेवांची क्षमा मागितली. जमेल तेवढी व्यष्टी साधना चालू केली. मी क्षमा मागितल्यावर मला पुष्कळ हलके वाटले.’’ मी त्यांना परात्पर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आणि गेल्या वर्षी सौ. मनीषा पाठक यांनी सांगितल्यानुसार गुरुदेवांच्या चरणी पुढील आत्मनिवेदन करण्यास सुचवले, ‘आतापर्यंत मला ज्यांच्यामुळे त्रास झाला असेल, त्यांना मी मनापासून क्षमा करतो. माझ्याकडून कळत नकळतपणे जे दुखावले गेले आहेत, त्यांची मी क्षमा मागतो.’ ‘यजमानांनी तसे आत्मनिवेदन केले असावे’, असे मला वाटते; कारण त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी त्यांनी मला सांगितले, ‘‘आता माझ्या मनात कुणाविषयी काहीच राहिले नाही.’’ गुरुदेवांनी अशा प्रकारे यजमानांची शुद्धी करून घेतली. केवढी ही गुरुकृपा !

१ अं. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने यजमानांच्या सर्व इच्छा पूर्ण होणे

१ अं १. मुलगी आणि नात घरी रहायला येणे : यजमानांनी मुलीला (सौ. शिल्पा गोरे हिला) ‘ईशाला (नातीला) घेऊन थोडे दिवस रहायला ये’, असे भ्रमणभाष करून सांगितले. त्यांनी यापूर्वी कधीच अशी इच्छा प्रदर्शित केली नव्हती. यजमानांचे निधन होण्यापूर्वी त्या दोघी ८ दिवस आमच्या घरी रहायला आल्या.

१ अं २. यजमानांचे घरी निधन होणे : यजमान खालील श्‍लोक नेहमी मनापासून आणि आर्ततेने म्हणत असत.

‘अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ।
देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्‍वर ॥

अर्थ : हे परमेश्‍वरा, मला मृत्यू सहजपणे येऊ दे. माझे जीवन कष्टांविना जाऊ दे आणि मृत्यूसमयी मला तुझे सान्निध्य लाभू दे.’

ते गेल्या २० वर्षांपासून रुग्णालयात कुणाला भेटायला गेल्यावर देवाला सांगायचे, ‘देवा, मला कधीही रुग्णालयात भरती करू नकोस. माझ्या नाका-तोंडात नळ्या नकोत. मला घरीच मरण येऊ दे.’ गुरुदेवांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली. त्यांना रुग्णालयात न्यावे लागले नाही. त्यांना घरीच मरण आले.

आताच्या एवढ्या कठीण काळातही गुरुदेवांच्या कृपेने त्यांच्यावरील अंत्यसंस्कार, त्यांचे अस्थीविसर्जन आणि पुढचे सर्व विधी व्यवस्थित पार पडले.

कृतज्ञता !

यजमानांनी मागील २४ – २५ वर्षे मला प्रेमाने केलेल्या साहाय्यामुळे आणि औषधोपचाराने मी साधना करू शकले. ‘गुरुदेवांची कृपा आणि यजमानांनी घेतलेली माझी काळजी’, यांमुळेच आज मी जिवंत आहे.

परात्पर गुरुदेव, आपल्या कृपेने मला असे पती लाभले. आपण माझ्याकडून यजमानांची सेवा करवून घेतलीत. यजमानांच्या पुढच्या प्रवासातही त्यांना आपली साथ लाभणार आहे. आपल्या या कृपेसाठी मी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.

२. सौ. शिल्पा गोरे (मुलगी), पुणे

अ. बाबांचे निधन झाल्यावर त्यांचा तोंडवळा शांत दिसत होता. ‘त्यांना त्रास झाला’, असे जाणवत नव्हते.

आ. त्यांच्या निधनानंतर घरात १० दिवस तेलाचा दिवा लावून ठेवला होता. या दिव्याजवळ बसायला चांगले वाटत होते. तिथे बसल्यावर माझे मन निर्विचार होत होते. दिव्यातील वात नीट करतांना त्यातील तेलाचे तापमान मला आल्हाददायक वाटायचे. एक दिवस त्या दिव्याजवळ चंदनाचा सुगंध येत होता.

इ. पहिल्या १० दिवसांत मला कधी रडू आल्यास ‘ते अश्रू थंड आहेत’, असे जाणवत असे.

ई. बाबांनी वापरलेल्या चादरींना चंदनाचा सुगंध येत होता.

गुरुदेव, आपण बाबांच्या पुढच्या प्रवासातही त्यांच्या समवेत असणार आहात. त्यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

३. सौ. सरोज साठे (कै. भिडेकाकांची धाकटी बहीण), गोरेगाव, जिल्हा रायगड

३ अ. प्रसन्न आणि अजातशत्रू व्यक्तीमत्त्व ! : विलास भिडे हे माझे मोठे बंधू ! ते सनातन संस्थेचे निष्ठावंत साधक होते. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार निष्ठा होती. ‘परमेश्‍वराशी सतत अनुसंधान आणि स्थिर वृत्ती’ यांमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढत राहिली. अतिशय संयमी, शांत आणि मनमिळावू स्वभाव यांमुळे ते अजातशत्रू होते अन् कुशल संघटकही होते. ‘दुसर्‍यांना टोचून बोलणे, टिंगल करणे आणि खिल्ली उडवणे’, या स्वभावदोषांपासून ते नेहमीच दूर राहिले. त्यांचे व्यक्तीमत्त्व अतिशय प्रसन्न आणि संयत होते. ते शिस्तप्रिय, वक्तशीर आणि व्यवहारकुशल होते. ते त्यांच्यावर सोपवलेले दायित्व पूर्णपणे निभावत असत.

प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त काही ना काही अर्पण देण्यासाठी ते मला भ्रमणभाष करत. या वर्षापासून मला त्यांचा भ्रमणभाष येणार नसला, तरी त्यांची स्मृती म्हणून मी वहिनीला नक्की काहीतरी अर्पण देईन. हीच माझी भावाला खरी श्रद्धांजली !

श्रीमती वर्षा भिडे यांनी लिहिलेल्या सूत्रांतून त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रतीचा अपार कृतज्ञताभाव जाणवणे

‘श्रीमती वर्षा भिडेकाकूंनी लिहिलेल्या लेखाचे संकलन करतांना मला काकूंचा परात्पर गुरुदेवांप्रती असलेला कृतज्ञताभाव सतत जाणवत होता. हे लिखाण म्हणजे काकूंनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतापत्र वाटते. पती विलास भिडेकाका यांच्यामध्ये अनेक गुण असूनही त्याचा कुठलाच अहं काकूंच्या लिखाणात जाणवला नाही. कठीण प्रसंगांतही त्या स्थिर राहिल्या. ‘त्यांनी प्रत्येक प्रसंगात आध्यात्मिक स्तरावर कसा विचार केला’, हे मला शिकायला मिळाले. गुरुदेवांची काकूंवर असलेली कृपा आणि काकूंची साधना, यांमुळेच हे शक्य झाले. ‘गुरुदेवांनी साधकांना कसे घडवले आहे’, हे जाणवून मला त्यांच्याप्रती अपार कृतज्ञता वाटली.’

– सौ. राजश्री खोल्लम (साधिका), पुणे (जून २०२१)