सातारा जिल्ह्यातील आशासेविका आणि गटप्रवर्तक यांचे पालकमंत्र्यांना निवेदन !

निवेदन देताना आशासेविका

सातारा, १६ जून (वार्ता.) – आशासेविका आणि गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून संप चालू करण्यात आला आहे. याला १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. कोरोना काळात तुटपुंज्या मानधनामध्ये सेवा देऊनही मागण्या मान्य होत नसल्याने हा संप करण्यात आला आहे. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन आशासेविका अन् गटप्रवर्तक यांच्या वतीने देण्यात आले.

गत २ वर्षांपासून आशासेविका आणि गटप्रवर्तक तुटपुंज्या मानधनावर सेवा पार पाडत आहेत. त्यातही मानधन अल्प आणि सेवा अधिक अशी स्थिती आहे. आशासेविकांनी प्रतिमाह १८ सहस्र, तर गटप्रवर्तकांनी प्रतिमाह २२ सहस्र रुपये मानधनाची मागणी केली आहे. तसेच आशासेविकांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, थर्मामीटर, स्कॅनगन आदी साहित्य द्यावे आणि गटप्रवर्तकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.