पुणे, १५ जून – दळणवळण बंदीच्या काळात केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी चालू होती. आता कोरोना रुग्णांची संख्या अल्प झाल्याने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व न्यायालये पूर्णवेळ आणि क्षमतेने चालू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर दाव्यांना पुढील तारखा देणेही थांबणार आहे. तसेच प्रलंबित आणि नव्याने प्रविष्ट होणार्या सर्व प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील न्यायालये मात्र पूर्वीप्रमाणे सकाळच्या सत्रात चालू रहातील. तेथे अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही, तसेच सर्व बार रूम्स ५० टक्के आसन क्षमतेने उघडे ठेवण्यात येणार आहेत, तर बार रूम्स आणि टेबल स्पेसच्या ठिकाणी पक्षकारांना बोलवण्यास अनुमती देण्यात आलेले नसल्याचे धोटे यांनी स्पष्ट केले आहे.