इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १५ जून – कोरोना विलगीकरण केंद्रातील विनयभंगप्रकरणी अमीर मरमसाब शेख (वय २१ वर्षे) याला एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ सहस्र दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावली. कोरोना संसर्गाच्या काळात वर्षभरात खटला चालून शिक्षा लागलेले हे पहिलेच प्रकरण आहे.
१. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोरपडे नाट्यगृह चौकातील मुलींच्या वसतीगृहात गेल्या वर्षी संस्थात्मक विलगीकरण केंद्र चालू करण्यात आले होते. एका युवतीसह सांगोला येथून आलेल एक कुटुंब या केंद्रात होते, तर कर्नाटक राज्यातून प्रवास करून आल्यामुळे अमीर शेख याला याच केंद्रात ठेवले होते.
२. १६ मे २०२० ला पीडित युवती स्नानगृहात गेल्यावर अमीर शेख हा स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पहात असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले.
३. पोलिसांनी शेख याला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
४. न्यायालयाने वर्षभरात या प्रकरणाची ५ वेळा सुनावणी घेतली. पीडित युवती, युवतीची आई यांच्यासह ९ जणांची साक्ष या प्रकरणी झाली. प्रत्यक्षदर्शी साक्षी-पुरावे आणि सरकारी अधिवक्ता एम्.डी. आवारीवार यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस्. भंडारी यांनी संशयित शेख याला १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांनी पीडित युवतीला हानीभरपाई देण्याविषयी न्यायालयाने सूचित केले आहे.
५. या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेने गतवर्षी शेख याला कठोर शासन होण्यासाठी, तसेच दोन वर्षांपेक्षा अधिक काळ तडीपार करण्यासाठी निवेदन दिले होते. यानंतर प्रशासनाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अमीर शेखला १ वर्ष तडीपार करण्याचे आदेश दिले होते.