कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू. नक्षलवाद्यांनी मराठा समाजाविषयी जी सहानुभूती दाखवली, त्याविषयी आम्ही आदरच करतो; परंतु जर तुम्ही शिवबांचे खरोखर वैचारिक पाईक असाल, तर नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. मराठा समाजाला उद्देशून नक्षलवाद्यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राला खासदार संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संभाजीराजे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
१. कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणिवा असणारच. लोकशाहीविषयी काहींचे वेगळे मत असू शकते; परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला आणि यशस्वी वाटचाल करत आलो आहोत.
२. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे; पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही; म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मतपेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राचे भले आहे.
३. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या सहस्रो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था लागू केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हावे.
४. मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतरसुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने सातत्याने बलिदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज ह्या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे.
५. मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याविषयी आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे अधिकार मागत आहोत. न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, असे मार्ग आम्ही स्वीकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चाची नोंद घेतली आहे.