कवळे (फोंडा) येथील श्री शांतादुर्गा संस्थानच्या नावाने उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथे बनावट संकेतस्थळ आणि अधिकोषात खाते उघडून पैसे उकळल्याचे उघड

पोलिसांत तक्रार प्रविष्ट

कवळे येथील सुप्रसिद्ध श्री शांतादुर्गा देवस्थान

फोंडा, १३ जून (वार्ता.) – कवळे येथील सुप्रसिद्ध श्री शांतादुर्गा देवस्थानच्या नावाने उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथील एका व्यक्तीकडून बनावट संकेतस्थळ आणि अधिकोषात खाते उघडून भाविकांकडून देणग्यांच्या नावाने पैसे उकळल्याची माहिती उघड झाली आहे. श्री शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष त्रिलोकनाथ बोरकर यांनी याविषयी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

अध्यक्ष त्रिलोकनाथ बोरकर तक्रारीत म्हणतात, ‘‘कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या नावाने बनावट संकेतस्थळ आणि अधिकोषात खाते उघडण्यात आले आहे. याद्वारे भाविकांकडून देणग्यांच्या नावाने पैसे उकळले जात आहे आणि गेले कित्येक मास हा प्रकार चालू आहे. याविषयी अधिक अन्वेषण केले असता संदीप वाघमारे नावाची व्यक्ती देवस्थान समितीचे सदस्य असल्याचा बहाणा करून ०९०२८०००२२१ या क्रमांकावरून भाविकांकडून धनादेश, रोख रक्कम किंवा ‘फोन पे’ या माध्यमांतून देणग्या स्वीकारत आहे. यासाठी उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ६२०९३५१७१७७ या क्रमांकाचे बनावट खातेही उघडण्यात आले आहे. श्री शांतादुर्गा देवस्थानने महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे देणग्या स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेले नाही. वाघमारे याने भाविकांकडून स्वीकारलेल्या देणग्यांसंदर्भात देवस्थान कोणतेही दायित्व घेणार नाही.’’ देवस्थान समितीने तक्रार प्रविष्ट करतांना संबंधित संशयित व्यक्तीचे संभाषण संकलित केल्याचा पुरावा पोलिसांकडे सुपुर्द केला आहे. श्री शांतादुर्गा देवस्थानचे नाव अपकीर्त केल्याच्या प्रकरणी संशयितावर गुन्हा नोंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. फोंडा पोलिसांनी तक्रारीची एक प्रत रायबंदर येथील ‘सायबर’ विभागालाही पाठवली आहे.