चिनी अ‍ॅप्सद्वारे २४ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या टोळीला अटक

५ लाख भारतियांकडून उकळले १५० कोटी रुपये !

भारत सरकारने आता चीनच्या प्रत्येक अ‍ॅपवर देशात बंदी घातली पाहिजे, हेच यावरून लक्षात येते !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – देहली पोलिसांच्या सायबर शाखेने एका टोळीला अटक केली आहे. या टोळीने चिनी अ‍ॅप्सद्वारे ५ लाख भारतियांची फसवणूक करून १५० कोटी रुपयांची लूट केली आहे. या रकमेत २५० कोटी रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. या टोळीने ‘२४ दिवसांत पैसे दुप्पट करून देतो’, असे सांगत लोकांची फसवणूक केली आहे. तसेच त्यांची वैयक्तिक माहितीचीही चोरी केली आहे. पोलिसांनी एकूण ११ जणांना अटक केली असून त्यात दोघेजण सनदी लेखापाल आहेत. पोलिसांनी २ चिनी अ‍ॅप्सवरही कारवाई केली आहे.

पोलीस उपायुक्त अन्येश रॉय यांनी सांगितले की,

१. ‘न्यू ब्लड’, ‘ईजी प्लान’ आणि ‘सन फॅक्टरी’ नावांचे अ‍ॅप भारतात मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केले जात होते. अवघ्या दीड मासांमध्ये ५० लाख भारतियांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. आमच्या सायबर शाखेनेही यातील एक अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचे विश्‍लेषण केल्यावर लक्षात आले की, हे अ‍ॅप चीनमधून हाताळले जात आहे आणि त्याचा सर्व्हरही चीनमध्ये आहे.

२. या अ‍ॅपद्वारे लोकांना २४ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. कमीत कमी ३०० रुपयांची गुंतवणूक केली जात होती. सायबर शाखेनेही नकली ग्राहक बनून यात पैसे गुंतवले. त्यानंतर लक्षात आले की, चिनी नागरिकांच्या सांगण्यावरून त्यांचे भारतातील लोक ग्राहकांची लूटमार करत आहेत.

३. यानंतर देहली आणि बंगाल येथे कारवाई करून काही जणांना अटक करण्यात आली. बंगालमधून शेख रोबिन याला अटक केल्यावर देहलीतून अविक काडिया, रौनक बंसल, उमाकांत आकाश जोयस, वेद चंद्रा, हरिओम, अभिषेक, अरविंद, शशी बंसल, मिथलेश शर्मा आणि अन्य काही जणांना अटक करण्यात आली. यातील अविक काडिया आणि रौनक बंसल हे सनदी लेखापाल आहेत. त्यांच्याकडून ३० भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे २९ बँकखाती असल्याची माहितीही मिळाली. त्यात ९७ लाख रुपये होते. पोलीस या प्रकरणी चीन सरकारच्या सहभागाचीही चौकशी करत आहे.

४. या आरोपींनी बनावट नावाने बँकखाती उघडली होती, तसेच आस्थापने बनवली होती. शेख रोबिन ३० आस्थापने चालवत होता, तर अविक काडिया ११० आस्थापने चालवत होता.

५. पहिल्यांदा ३०० रुपये गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना २४ दिवसांत ते दुप्पट रक्कम देत होते. नंतर लोकांनी अधिक पैसे गुंतवल्यावर त्यांना पैसे परत दिले जात नव्हते. अ‍ॅपवर मात्र ‘पैसे देण्यात आले आहेत’, असा संदेश पाठवला जात होता; मात्र प्रत्यक्षात बँकेच्या खात्यात पैसे जमा होत नव्हते.