सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ उद्योजक वार्तालापाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
नाशिक – उद्योजक आणि व्यावसायिक यांनी व्यवसाय करत असतांना स्वतःचा राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी सहभाग कसा असेल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन ‘पितांबरी’ उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ उद्योजक वार्तालापामध्ये ते बोलत होते. या वार्तालापात सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा उद्देश आणि सूत्रसंचालन कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी केले. या वार्तालापात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील २०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते.
श्री. रवींद्र प्रभुदेसाई पुढे म्हणाले…
१. सध्या कोरोनामुळे सर्व उद्योग बंद आहेत. सर्वांनाच मानसिक तणाव आहे. यामुळे अशा कार्यक्रमांची पुष्कळ आवश्यकता आहे. सनातन संस्थेने या कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले.
२. परमेश्वराकडे वळणे पुष्कळ कठीण असते. काही काळापूर्वी आमच्यावर बरीच संकटे आली होती. माझा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. नंतर मी बर्याच संघटना किंवा त्यांचे कार्यक्रम यांमध्ये सहभागी झालो; पण मला समाधान मिळाले नाही. व्यावसायिकदृष्ट्या वाटणार्या भीतीविषयी कुणाशीही बोलता यायचे नाही.
३. वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा त्यांना भेटलो. त्यांचे प्रवचन ऐकून मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न केले, तसेच सत्संग आणि मार्गदर्शन यांत सहभागी होऊ लागलो.
४. व्यवसायात जसे आर्थिक नियोजन असते, तसे सनातन संस्थेमध्ये आध्यात्मिक पाठबळ म्हणजे काय असते ? ते शिकायला मिळाले. व्यवसाय करतांना आध्यात्मिक पाठबळ असल्यासच त्याचा लाभ आपल्याला व्यवसायातही होतो.
५. ‘उद्योगाच्या माध्यमातून आपण साधना करून ईश्वरप्राप्ती करू शकतो’, हा दृष्टीकोन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिला. साधना असेल, तर मानसिक तणाव येऊ शकत नाही.
मी कोरोनासारख्या आजारातून केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच बाहेर पडलो. परात्पर गुरुदेवांना भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगाची काळजी आहे. ‘विश्वकल्याण व्हावे’, असे त्यांना वाटते. त्यांच्यासारखे गुरु लाभले, म्हणून मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.- रविंद्र प्रभुदेसाई |
भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी ईश्वरी कृपा आणि साधना हवी ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना कोरोनामुळे शारीरिक आणि मानसिक त्रासही झाला. पुढील आपत्काळात तर याहीपेक्षा भयंकर हानी होणार आहे. तिसरे जागतिक महायुद्ध होणार आहे. अनेक राष्ट्रांची विचारसरणी ही सध्या तिसर्या महायुद्धाच्या दिशेनेच होत आहे. त्यामुळे येणार्या भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी ईश्वरी कृपा आणि साधना हवी. ते असल्यासच आपण सुरक्षित राहू शकतो.