घराघरांत शिवस्वराज्य गुढी उभी करून ‘शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा

शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने अभिवादन करतांना शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचचे कार्यकर्ते

कोल्हापूर, ७ जून (वार्ता.) – प्रत्येक वर्षी ‘शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या वतीने वेगवेगळ्या किल्ल्यांवर शिवराज्याभिषेकदिन साजरा केला जातो. या वेळी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा कोरोना महामारीमुळे आणि शासकीय निर्बधांमुळे शंभुराजे मंचच्या वतीने घराघरात शिवस्वराज्य गुढी उभी करून शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा करण्यात आला. सदस्यांनी त्यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हटला. नंतर प्रत्येकाने घरामध्ये साखर आणि पेढे वाटली.

अभिवादन करतांना नगराध्यक्षा रूपाली धडेल आणि श्री. सूरज विनायक ढोली

किल्ले पन्हाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील मूर्तीस मंत्रोच्चारासह जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यात आला. पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल आणि शंभुराजे मंचचे अध्यक्ष श्री. सूरज विनायक ढोली यांच्या वतीने हे विधी करण्यात आले. जोतिबा डोंगर शाखेच्या वतीने जोतिबा डोंगरावर ११ वडाची रोपे लावण्यात आली आणि विविध प्रकारच्या १ सहस्र झाडांच्या बिया रुजवण्यात आल्या. या वेळी शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचचे अध्यक्ष श्री. सूरज ढोली, सर्वश्री युवराज पाटील, सूर्यभान ढोली, धनंजय उपारी, तसेच सदस्य आणि खेळाडू उपस्थित होते.