राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय यांमध्ये शिवराज्याभिषेकदिन ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून साजरा होणार ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ६ जून या दिवशी दिली, तसेच राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांमध्ये शिवराज्याभिषेकदिन ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून साजरा होणार असून यावर्षीपासून त्याचा प्रारंभ केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) च्या वतीने आयोजित शिवस्वराज्यदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सामंत पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळातही राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या हिताचे निर्णय कसे घ्यायचे, ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून वारंवार मिळते. महाविकास आघाडीचे सरकार याच मूल्यांच्या आधारे महाराष्ट्राच्या सार्वभौम प्रगतीसाठी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. यंदा कोरोनामुळे सामाजिक सुरक्षेचे नियम असल्याने शिवज्योत रॅली आणि विविध स्पर्धा यांचे आयोजन करता आलेले नाही; परंतु पुढील वर्षी शिवस्वराज्यदिन दिमाखात साजरा होईल. उत्कृष्ठ शिवज्योत रॅलीचे आयोजन करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयाला राज्य सरकारकडून पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी ‘शिवनिती’ विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.