सातारा, ६ जून (वार्ता.) – प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाविषयी सजग राहिल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो. आपला देश विविध क्षेत्रात प्रगती करत आहे; मात्र अशा वेळी पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धन यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा पर्यावरणदिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. सध्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होतांना दिसत आहे. त्यामुळे सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. यामुळे प्रत्येकानेच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली, तर पर्यावरणाचा र्हास थांबेल. कोरोनामुळे ऑक्सिजनचेही महत्त्व मानवाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या परिसरात झाले लावल्यास आपल्याला चांगला ऑक्सिजनही मिळेल.’’