परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणारे युवक सिद्ध करून भावी राष्ट्रनिर्मितीसाठी पिढी घडवली !

बालपणापासून, किंबहुना गर्भात असल्यापासूनच जिवावर सात्त्विकतेचे संस्कार केल्यास आदर्श आणि धर्माचरणी युवक निर्माण होऊ लागतील ! सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माचे शास्त्र आणि उपासना समजून घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यास समाजाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. ‘धर्माचरण करणे’, हेच सध्याच्या बहुतांश समस्यांवरील उत्तर असून अनेक वर्षांपासून सनातन संस्था धर्माचरणाचे महत्त्व समाजमनावर बिंबवत आहे. सनातन संस्थेच्या अनेक वर्षांच्या तपस्येचे फळ, देवतांचे आशीर्वाद आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन अन् कृपा यांमुळे आज सहस्रो युवक सन्मार्गावरून जात आहेत.

भगवंताने त्याच्या दिशाहीन लेकरांना दिशा देण्यासाठीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून कार्य आरंभलेले आहे. परात्पर गुरुदेव सर्व समाजाला, किंबहुना अवघ्या विश्‍वाला अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने घेऊन जात आहेत. सनातनच्या माध्यमातून त्यांनी अनेक जिवांना सन्मार्गावर आणून सोडले आहे. चंगळवादी झालेल्या मनुष्याला त्याच्या जीवनाचे ध्येय सांगणे, त्याच्याकडून साधना करून घेऊन त्याला ‘वाल्याचा वाल्मीकि’ करणे, हे अत्यंत महाकठीण कार्य ते अहोरात्र करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, त्यांच्या शिकवणीमुळे हिंदूंमधील तेज जागृत होत असून सर्वत्र हिंदु राष्ट्राचा हुंकार ऐकू येऊ लागला आहे. त्यामुळे आता काही वर्षांतच ‘हिंदु राष्ट्राची सोनेरी पहाट होणार’, यात शंका नाही !