पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – २० जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने आषाढी सोहळ्याच्या कालावधीतही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद रहाणार आहे. १२ जुलैपासून पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने दर्शन भाविकांना २४ घंटे घेता येणार आहे, असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंढरपूर येथील भक्त निवास येथे घेण्यात आली. या बैठकीनंतर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या.
१. या वेळी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येणार्या वारकर्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या अडचणी सोडवून वारकर्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मंदिर समिती सिद्ध असल्याचे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
२. आषाढी सोहळ्यानिमित्त ठरलेले मानाचे नेवैद्य दाखवण्याची अनुमती देण्यात आली आहे. नियमित ठरल्याप्रमाणे पादुका आणि पालखी यांच्या भेटी घडवण्यात येणार आहेत. मानाचे वारकरी, दिंडेकरी आणि मानाचे महाराज मंडळी अशा १९५ जणांना देवाचे दर्शन देण्याचे ठरवण्यात आले आहे.
३. पंढरपूर येथील फडकरी आणि येणार्या दिंड्यांना नगरप्रदक्षिणा करण्यासाठी, तसेच पांडुरंगाच्या रथालाही श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करण्याची अनुमती देण्यात आली आहे.