उत्साही, स्वावलंबी, प्रेमळ आणि अखंड कृतज्ञताभावात रहाणार्‍या पुणे येथील सनातनच्या ४८ व्या संत पू. निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) !

‘वैशाख कृष्ण पक्ष दशमी (४.६.२०२१) या दिवशी पुणे येथील पू. निर्मला दातेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे कृतज्ञतापूर्वक दिली आहेत.

पू. निर्मला दातेआजी

पू. निर्मला दातेआजी यांच्या चरणी सनातनच्या साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. श्री. नरेंद्र दाते आणि सौ. ज्योती नरेंद्र दाते (पू. दातेआजींचा मोठा मुलगा आणि सून)

श्री. नरेंद्र आणि सौ. ज्योती दाते

१ अ. उत्साही असणे : ‘पू. दातेआजी आज वयाची ८८ वर्षे पूर्ण करून ८९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह, सतर्कता आणि प्रगल्भ बुद्धी हे गुण शिकण्यासारखे आहेत. पू. आजींना कधीच कोणत्याही गोष्टीचा आळस किंवा कंटाळा नसतो. त्यांच्या शब्दकोषात ते शब्दच नाहीत.

१ आ. स्वावलंबी असणे

१. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करतात. एवढे वय असूनही त्या रात्री खोलीतील दिवे वा पंखा लावण्यास कधीच कुणाला सांगत नाहीत. त्या स्वतः उठून लावतात. त्या लहान कपडे स्वतः काठीने दोरीवर वाळत घालतात आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचे अंघोळीचे कपडे काढून ठेवतात.

१ इ. चांगली स्मरणशक्ती : सध्या त्यांना कानाने अल्प ऐकू येते, तरीही त्या पुष्कळ वेळा योग्य उत्तरे देतात. ‘त्यांना अल्प ऐकू येते’, असे वाटत नाही. या वयातही देवाने त्यांची स्मरणशक्ती चांगली ठेवली आहे. कधी कधी आम्हालाही कुणाची नावे आठवत नाहीत; परंतु त्यांना ती लगेच आठवतात.

१ ई. जिज्ञासू वृत्ती : त्या प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचतात. एखादे वृत्त आमच्याकडून वाचायचे राहिले असेल, तरी पू. आजी आम्हाला ते सांगतात. त्या आश्रमातील फलकावर मोठ्या अक्षरांत लिहिलेल्या सूचना पूर्ण वाचतात आणि त्याविषयी शंका असल्यास आम्हाला विचारतात. यातून त्यांची जिज्ञासू वृत्ती शिकायला मिळते.

१ उ. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे : आम्ही पुणे येथून रामनाथीला येतांना पू. आजी यांनी नातेवाइकांना आपणहून संपर्क केला. अनेक जण त्यांना आपुलकीने भेटायला आले. पू. आजींची सर्वच नातेवाइकांशी जवळीक आहे. त्यांना सर्वांविषयी प्रेमही आहे. त्यांनी सर्वांना निरपेक्षपणे साहाय्य केल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वांना प्रेम वाटते. काही नातेवाईक त्यांच्याशी काही प्रसंगांत योग्य वागले नाहीत, तरी त्यांनी सर्वांचे प्रेमानेच केले. मनात कोणताही आकस किंवा पूर्वग्रह ठेवला नाही.

१ ऊ. परिस्थिती स्वीकारणे

१. वर्ष १९६२ मध्ये पू. दातेआजी यांनी स्वतःचे दागिने विकून पुण्यातील घराची जागा (प्लॉट) घेतली होती. त्या घराविषयी त्यांना पुष्कळ ओढ होती. आम्ही अनेक वर्षे तिथे रहात होतो. गोवा येथे येण्यापूर्वी ते घर बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डरला) विकण्यास त्यांना जड जात होते; मात्र नंतर त्यांनी त्यासाठी आनंदाने अनुमती दिली.

२. गेल्या दीड मासापासून पू. आजी रामनाथी आश्रमात आहेत. आश्रमात रहाणे प्रथम त्यांना अवघड वाटत होते. ‘आता मला काही होत नाही. त्यामुळे साधकांना माझी सेवा करावी लागेल’, असे त्यांना वाटत होते; परंतु नंतर त्या आश्रमात रहायला येण्यास सिद्ध झाल्या. त्यांनी लवकरच आश्रमजीवन स्वीकारले. त्यांनी आश्रमातील कार्यपद्धतीही आनंदाने स्वीकारल्या आहेत.

३. पुणे आणि गोवा येथील हवामानात पुष्कळ भेद आहे, तरीही पू. आजी त्याविषयी कधीच काही बोलत नाहीत.

१ ए. कृतज्ञताभाव : कोरोना महामारीमुळे समाजात पुष्कळ भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘आपल्याला परात्पर गुरु डॉक्टरांनी पुण्यातून बाहेर काढले आणि आश्रमात सुखरूप ठेवले’, त्याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.

पू. दातेआजींच्या सत्संगाचा आम्हाला लाभ करून घेता येऊ दे, ही प.पू. गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच कृपेने ही सूत्रे लिहिता आली, यासाठी कृतज्ञ आहोत.’ (१३.५.२०२१)


सौ. नेहा निरंजन दाते (पू. दातेआजींची धाकटी सून)

१. दुसर्‍यांचा विचार करणे : ‘मी पू. आजींना कॉफी देण्याची सेवा करत होते. त्यांना कॉफी लवकर आणि गरम मिळावी; म्हणून मी कॉफी केलेली भांडी न घासता तिथेच ओट्यावर ठेवून जायचे. ती भांडी नंतर कुणीतरी घासून ठेवायचे. हे मी पू. आजींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘कॉफी झाकून ठेव, म्हणजे ती गरम राहील. कॉफी बनवलेली सर्व भांडी घासून मगच मला कॉफी आणून दे.’’ नंतर मी तसे करू लागले आणि ‘ते योग्यच होते’, हे लक्षात आले.

२. स्वावलंबी असणे : एकदा खोलीत थोडा केर होता. त्या वेळी खोलीत कुणी नव्हते. मी खोलीत आले, तेव्हा पाहिले की, या वयातही पू. आजी स्वतः केर काढत होत्या.

३. आपल्या आजूबाजूला कुणी त्रास देणारी माणसे रहात असली, तरी आपण शेजारधर्म म्हणून त्यांच्याशी प्रेमानेच वागायला पाहिजे, हे मी पू. आजींकडून शिकले.’

– सौ. नेहा निरंजन दाते


पूज्य आजींकडून अखंड
शिकणे हीच खरी कृतज्ञता ।

पूज्य निर्मला दातेआजी ।
असे ज्यांच्यात अपार प्रीती ।

असो कुणी सान अथवा महान ।
सर्वांवरच पू. आजींचे प्रेम असे ।। १ ।।

गुरुदेवांच्या चरणी त्यांचा भाव अपार ।
उच्चारता ‘परम पूज्य डॉक्टर’ ।
भावाश्रू येती डोळ्यांतून फार ।। २ ।।

असे त्यांची श्रद्धा आणि अतुट भक्ती ।
घोर आपत्काळात परिस्थितीशी त्या जुळवून घेती ।। ३ ।।

व्यवहार असो वा साधना ।
त्यांच्यात असे सातत्य, चिकाटी आणि सहनशीलता ।
सर्वच कृतीत असे कौशल्य आणि नियोजनबद्धता ।। ४ ।।

पू. आजी गुणांची खाण असे ।
नावाप्रमाणेच त्यांच्यामध्ये निर्मळता ही बहू असे ।। ५ ।।

पूज्य आजींकडून अखंड शिकणे ।
हीच खरी कृतज्ञता असे ।
प्रार्थना हीच श्रीगुरुचरणी ।
तसे आमचे प्रयत्न होऊ दे ।। ७ ।।

– सौ. ज्योती नरेंद्र दाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२१)


आजी माझ्यासाठी आदर्श तू ।
त्यागाचे रूप तू ।

मायेचे प्रतीक तू ।
कष्टांची परिसीमा तू ।

आजी माझ्यासाठी आदर्श तू ।। १ ।।

जसे अर्जुनाने नेत्र रोखले पोपटाच्या अक्षि ।
रात्रंदिवस होता एकच ध्यास तुझ्यापाशी ।

अपार जिद्द आणि अपार कष्ट केलेस तू ।
मुलांना शिकवण्याचे ध्येय अखेर साधलेस तू ।। २ ।।

सोन्याचे हे दिवस, आज तुझ्यामुळे पहातो ।
तुझ्यामुळेच आम्हा हा, सन्मान आज लाभतो ।

म्हणूनच प्रसंगी तुला, दुखावले आम्ही जरी ।
येतो तुझ्याचपाशी, त्याला कोण काय करी ।। ३ ।।

तूच आमची आजी ।
हे उपकार जणू परमेश्वराचे ।

आजी खरंच तुझ्या थोरवीपुढे ।
आज हे गगन भासे ठेंगणे ।। ४ ।।

– सौ. पूर्वा कुलकर्णी (पू. दातेआजींची नात), कॅनडा (१३.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक