गाझियाबाद येथील डासना देवी मंदिरात संशयास्पदरित्या आलेले दोघे पोलिसांच्या कह्यात !

  • सर्जिकल ब्लेड जप्त

  • माझी हत्या करण्यासाठी आल्याचे महंत यति नरसिंहानंद यांचा दावा

यावरून उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंचे संत, महंत, साधू हे असुरक्षित असल्याचे लक्षात येते. यास्तव राज्य सरकारने संत, महंतांना अधिक सुरक्षा प्रदान करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

डावीकडून महंत यति नरसिंहानंद सरस्वती आणि आरोपी

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील प्रसिद्ध डासना देवी मंदिरामध्ये २ जूनच्या रात्री दोन तरुणांना मंदिरांतील सेवेकर्‍यांनी पकडले. हे दोघेही स्वतः हिंदू असल्याचे सांगत मंदिराच्या प्रवेशद्वारावर आले होते; मात्र त्यांची चौकशी केली असता त्यातील एक मुसलमान असल्याचे उघड झाले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सर्जिकल ब्लेड सापडले. मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी आरोप केला आहे, हे दोघेही त्यांना ठार मारण्यासाठी आलेले आतंकवादी आहेत. पोलिसांनी या दोघांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

१. या दोघांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांना त्यांची नावे नागपूर येथील विपुल विजयवर्गीय आणि दुसर्‍याने काशी गुप्ता असे सांगितले होते. त्यांच्याकडे एक बॅग होती. त्यानंतर सेवेकर्‍यांनी त्यांची चौकशी केली असता काशी नाव सांगणार्‍याचे खरे नाव कासिफ महंमद असल्याचे उघड झाले. तो गाझियाबादच्याच संजयनगरमध्ये रहाणारा आहे.

२. विपुल विजयवर्गीय याने सांगितले, मी सर्जिकल ब्लेडद्वारे उपचार करतो. विपुल आणि कासिफ यांच्यात ३ वर्षांपूर्वी फेसबूकवर मैत्री झाली होती. विपुल गाझियाबाद येथे आला असता त्याने डासना देवी मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे ते दोघे मंदिरात आले, असे त्यांनी चौकशीत सांगितले.

३. महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांची हत्या करण्यासाठी काश्मीरमधून देहलीमध्ये आलेल्या एका आतंकवाद्याला नुकतीच अटक करण्यात आली होती. त्याला जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने पाठवले होते. महंत यति नरसिंहानंद यांनी इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह विधाने केल्याने जिहाद्यांकडून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.