प्राथमिक आरोग्यकेंद्रांसाठी आणलेल्या रुग्णवाहिका ५ दिवस जिल्हा मुख्यालयात विनावापर !

प्रातिनिधिक चित्र

सावंतवाडी – सद्य:स्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असतांना, तसेच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना रुग्णांच्या सेवेसाठी खनिकर्म विभागाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आर्.टी.ओ.कडून) ‘पासिंग’ करून न घेतल्याने गेले ५ ते ६ दिवस मुख्यालयात उभ्या आहेत. यातील एक रुग्णवाहिका मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी संमत करण्यात आली आहे; मात्र या रुग्णवाहिकेचे ‘पासिंग’ न झाल्याने ती अद्याप मिळू शकली नाही. त्यामुळे येत्या ४ जूनपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली नाही, तर मुख्यालयात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकांच्या टपांवर (वरच्या भागांवर) बसून आंदोलन करू, अशी चेतावणी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत मराठे यांनी दिली आहे.

एकीकडे सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका मिळत नसतांना शासनाकडून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका ५ ते ६ दिवस वापर न करता केवळ ‘पासिंग’ केले नाही म्हणून मुख्यालयात शोभेच्या वस्तूसारख्या उभ्या करून ठेवणे योग्य आहे का ? याविषयी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी निर्णय घेतील का ? असा प्रश्‍न हेमंत मराठे यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ५६४ रुग्ण

१. आतापर्यंतचे एकूण रुग्ण – २७ सहस्र ६४६

२. २४ घंट्यांत मृत्यू झालेले रुग्ण – ८

३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण – ७०५

४. उपचार चालू असलेले रुग्ण – ५ सहस्र ८३१

५. बरे झालेले रुग्ण – २१ सहस्र १०४