कराड, २ जून (वार्ता.) – कराड शहरासह मलकापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरामध्ये ढगफुटी झाल्याप्रमाणे रस्त्यावरून पाणी वहात होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पावसाचे पाणी लाहोटी प्लाझामधील तळमजल्यामध्ये घुसल्याने तेथील व्यापार्यांची हानी झाली. तसेच कराड रुग्णालयाच्या तळमजल्यामध्ये पाणी आल्याने रुग्णालय व्यवस्थापनाची भंबेरी उडाली. अनेक रुग्णांचे हाल झाले. कृष्णा रुग्णालयातही पाणी साठल्याने रुग्णांचे हाल झाले. मलकापूर-आगाशिवनगरमधील घराघरांत पाणी घुसून नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्यांची हानी झाली. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर झाडे उन्मळून पडून काही काळ वाहतूक ठप्प झाली.