महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणार्‍या ‘मस्साजोग’सारख्या घटना खपवून घेणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार

मुंबई – मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणात कोणतीही हयगय न करता दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. हत्येच्या घटनेला एक मास उलटल्याने पीडित कुटुंबीय काहीसे काळजीत सापडले होते. वास्तविक अन्वेषण यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांच्या वतीनेही या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणार्‍या ‘मस्साजोग’सारख्या घटना खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘या प्रकरणी दोषींना थारा न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात कुणीही दोषी असेल, त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधात अथवा राजकारणाशी संबंध नसणारा एखादा त्रयस्थ असो सर्वांवर कारवाई केली जाईल. बीडमध्ये अतिशय चांगले पोलीस अधीक्षक पाठवण्यात आलेत आणि अधीकांना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाविना कायदा सुव्यवस्था राखण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.’’

१९ जानेवारीपूर्वी पालकमंत्र्यांची घोषणा ! 

राज्यात पालकमंत्रीपद, मंत्रीपद, खातेवाटप हा अधिकार राज्याच्या प्रमुखांकडे असतो. आम्ही हे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहेत. मुख्यमंत्री १९ जानेवारीपूर्वी पालकमंत्रीपदांचे दायित्व वेगवेगळ्या मंत्र्यांकडे सोपवतील.