कोरोनाच्या उत्पत्तीसाठी वुहानमधील नव्हे, तुमच्या प्रयोगशाळेची चौकशी करा ! – चीनचे अमेरिकेला आव्हान

चीनने अमेरिकेला आव्हान देत बसण्यापेक्षा जागतिक मत त्याच्या विरोधात आहे, हे लक्षात घ्यावे. तसेच कोरोनाच्या निर्मितीविषयी जे सत्य आहे, ते जगाला सांगायला हवे !

वुहान येथील प्रयोगशाळा

बीजिंग (चीन) – कोरोना विषाणूची उत्पत्ती नेमकी कुठून झाली ? याचा शोध ९० दिवसांत घेण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना दिला आहे. याचा रोख चीनकडे असल्याने, तसेच चीनविषयी पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याने संतापलेल्या चीनने  ‘अमेरिकेने तिच्या प्रयोगशाळेची चौकशी करावी’, असे आव्हान दिले आहे. ‘अमेरिकेकडून या संदर्भात अपप्रचार चालू आहे’, असा दावाही चीनने केला आहे.

१. वुहान येथील प्रयोगशाळेतील ३ संशोधकांना जगात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोनाची लागण झाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने एका अहवालाच्या आधारे केला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी हा अहवाल फेटाळून लावला आहे.

२. लिजीयन म्हणाले की, वुहान प्रयोगशाळेतून विषाणू पसरल्याचे सूत्र वारंवार उचलण्यामागे अमेरिकेचा हेतू काय आहे ? अमेरिका कोरोना विषाणूच्या उगमाची माहिती करून घेण्यासाठी खरच गंभीर आहे कि इतर सूत्रांवरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे ?

३. अमेरिकेची भूमिका ही जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अन्वेषणाचाही अपमान आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे कोरोनाविरोधात दोन हात करण्यासाठी आवश्यक असणारी जागतिक एकजूट कमकुवत होईल. जर अमेरिकेला खरोखरच संपूर्ण पारदर्शकता हवी असेल, तर तिने चीनप्रमाणेच जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनाही अमेरिकेत चौकशीसाठी बोलवावे.