‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !

मुंबई – सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकीन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था (एच्.आय.टी.आर्.आय.) आणि घाना सरकार यांच्यात धोरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. परळ येथील ‘हाफकिन’ संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही संस्थांनी वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला.

ही बैठक भविष्यातील औपचारिक सहकार्याचा पाया रचणारी ठरली असून भारत आणि घाना या दोन्ही देशांमधील वैज्ञानिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य, जैवविविधतेवर आधारित औषध संशोधन, विषशास्त्र आणि ‘ट्रान्सलेशनल सायन्स’ या समान प्राधान्यक्रमांद्वारे दोन्ही संस्था नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींचा शोध, संशोधन परिसंस्थेचे बळकटीकरण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांतील आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी संयुक्तपणे कार्य करणार आहे.