जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्‍याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !

‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून घोषित करण्याची अन्न व औषध प्रशासनाकडे मागणी !

पुणे – जेजुरी गडावर भंडार्‍याला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेचा दाखला देत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी भंडार्‍यातील रासायनिक भेसळीवर बोट ठेवले आहे. जेजुरी गडासह राज्यातील विविध प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त भंडार्‍याची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे संकट भाविकांच्या सुरक्षेला आव्हान ठरत असल्यामुळे आमदार पाचपुते यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली आणि त्यांना एक विशेष निवेदन दिले. ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून घोषित करा, अशी मागणी आमदारांनी यावेळी केली. याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘येत्या काही दिवसांत ‘भंडारा म्हणजेच हळद’ हे कायद्यामध्ये अधोरेखित करू, असे स्पष्ट आश्‍वासन त्यांनी आमदारांना दिले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने लवकरच या संदर्भात एक अधिकृत परिपत्रक काढले जाण्याची शक्यता आहे.

आमदार पाचपुते यांनी मांडलेली सूत्रे !

१. अलीकडच्या काळात भंडार्‍यात मोठ्या प्रमाणावर मिश्रण (भेसळ) केले जात आहे. याचा थेट तोटा निष्पाप भाविकांना होत असून आमच्या धार्मिक श्रद्धेवरही याचा वाईट परिणाम होत आहे.

२. पूर्वीपासून भंडारा म्हणून शुद्ध हळदच विकली जात होती आणि पुढेही हळदच भंडारा म्हणून विकली गेली पाहिजे, या विचारधारेचे आम्ही सर्वजण आहोत. म्हणूनच लवकरात लवकर ‘भंडारा म्हणजे हळदच’ हे कायद्यामध्ये नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे.

कायद्यात भंडारा म्हणजे ‘हळद’च असे कुठेही नमूद न केल्याचा अपलाभ !

सध्या अन्न व औषध प्रशासनाकडे ‘भंडारा’ म्हणजे नेमके काय ?, याची कोणतीही ठोस किंवा कायदेशीर व्याख्या स्पष्ट नाही. कायद्यातही असे कुठेही नमूद नसल्याचा अपलाभ ठराविक लोक घेत आहेत. व्यावसायिक देवस्थान परिसरात रासायनिक रंग आणि ज्वलनशील रसायने मिसळलेल्या भंडार्‍याची सर्रास विक्री करत आहेत. एकूणच भेसळ करणारे आणि बनावट भंडारा विक्रेते यांवर कडक कायदेशीर कारवाई करतांना प्रशासनाला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? तसेच एखादा अपघात घडल्यावर जागे न होता अन्न व औषध प्रशासनाने जेजुरी, तुळजापूर, कोल्हापूर यांसारख्या राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांच्या परिसरात भंडारा अन् महाप्रसाद यांची नियमित आणि आकस्मिक पडताळणी केली पाहिजे !