जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !

हडपसर (पुणे) येथे हिंदु देवतेचे विडंबन रोखण्यात हिंदुत्वनिष्ठांना यश

भिंतीवर थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स

हडपसर (जिल्हा पुणे) – येथील ‘वैशाली हाईट्स’ या इमारतीच्या जिन्यामध्ये लोकांनी थुंकू नये, म्हणून हिंदु देवतांच्या चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. यामुळे देवतांची विडंबना होत असल्याचे आणि काही ठिकाणी थेट थूंकलेले असल्याचे धर्मप्रेमींच्या निदर्शनास आले. याविषयी माहिती मिळताच स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी तत्परतेने पावले उचलत, पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने या सर्व टाईल्स काळजीपूर्वक काढून त्यांचे विधीवत् विसर्जन केले.

मार्च २०२६ मध्ये हडपसर येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या नंतर स्थानिक भागात धर्मशिक्षणवर्ग चालू झाला आहे. या वर्गाच्या सामाजिक माध्यमांतील (सोशल मीडिया) समुहामध्ये सजग धर्मप्रेमी श्री. धीरज सूर्यवंशी यांनी या विडंबनाचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. हा व्हिडिओ पहाताच ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले यांनी तातडीने गोरक्षक श्री. आबा बंडगर यांच्याशी संपर्क साधला.

काढलेल्या टाईल्स दाखवतांना हिंदुत्वनिष्ठ

या धर्मप्रेमींचा होता सहभाग

या यशस्वी मोहिमेमध्ये ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले, श्री. आबा बंडगर, श्री. अनिकेत मांडे, श्री. धीरज सूर्यवंशी, श्री. यशराज काळे, श्री. बाबू काळे आणि श्री. आर्यन काळे यांचा सहभाग होता.

भिंतीवर थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स

धर्मशिक्षणाचा परिणाम

मार्च महिन्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे स्थानिक हिंदु बांधवांमध्ये निर्माण झालेली धर्मजागृती आणि धर्मशिक्षण यांचाच हा परिणाम आहे. केवळ व्हिडिओ पाहून शांत न बसता, समाजकंटकांचा वैचारिक प्रतिकार करत देवतांचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदु समाजाने संघटितपणे ही कृती केली. माहिती मिळताच श्री. आबा बंडगर यांच्यासह अन्य धर्मप्रेमी तत्परतेने संबंधित सोसायटीमध्ये पोचले. त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. १० ते १५ मिनिटांत पोलीस घटनास्थळी आले आणि पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना या टाईल्स काढण्याची अनुमती दिली. त्यानंतर सर्व धर्मप्रेमींनी अत्यंत काळजीपूर्वक त्या टाईल्स काढल्या आणि विधीवत् त्यांचे विसर्जन केले. या मोहिमेत पोलिसांनी उत्तम सहकार्य केले.