सांगली, २८ मे (वार्ता.) – प्रखर राष्ट्रभक्त, प्रभावी वक्ते, प्रतिभाशाली कवी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर सर्व शक्तीनुसार स्वातंत्र्यासाठी लढले. अंदमान बेटावर त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. एकांतवास सोसला, बैलासारखा कोलू चालवून घाण्याचे तेल काढले. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर केवळ देश आणि आपला समाज यांच्या उत्कर्षाची चिंता त्यांनी आयुष्यभर वाहिली. असे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे मानबिंदू आहेत, असे विचार भाजपचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री. प्रकाशतात्या बिरजे, गटनेते श्री. विनायक सिंहासने, युवामोर्चा अध्यक्ष श्री. धीरज सूर्यवंशी, नगरसेवक श्री. संजय कुलकर्णी, नगरसेविका कल्पना कोळेकर, श्री. संतोष सरगर यांसह अन्य उपस्थित होते.
माधवराव गाडगीळ मित्र परिवार, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !
मिरज – माधवराव गाडगीळ मित्र परिवार, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मिरज विभाग, श्री विघ्नराज सार्वजनिक उत्सव मंडळ पाटील हौद मिरज यांच्या वतीने मैदान दत्त चौक येथे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वेणाबाई मठ येथील गोशाळेतील देशी गाईंना चारा वाटप करण्यात आला. या वेळी युवानेते पृथ्वीराज (भैय्या) पवार, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश ठाणेदार, श्री. श्रेयस गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. माधवराव गाडगीळ यांसह अन्य उपस्थित होते.
भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुष्पहार अर्पण !
मिरज – मैदान दत्त चौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे आणि ज्येष्ठ नागरिक विनयराव गोखले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, भाजप शहराध्यक्ष राजेंद्र नातू यांसह अन्य उपस्थित होते.