|
नागपूर – येथे ‘टॉसिलीझुमॅब’ इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या होमिओपॅथीच्या २ आधुनिक वैद्यांसह तिघांना पोलिसांनी २६ मे या दिवशी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ३ आरोपींकडून इंजेक्शन, एक दुचाकी आणि ३ भ्रमणभाष, असा एकूण १ लाख ६५ सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (आधुनिक वैद्यच काळाबाजार करू लागले, तर पुढील काळात आरोग्य विभागात गुन्हेगारांचाच भरणा होईल कि काय ? असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
४० सहस्र किमतीचे ‘टॉसिलीझुमॅब’ इंजेक्शन हे आरोपी १ लाख रुपयांमध्ये विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून व्यवहार ठरवल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला. या इंजेक्शनची विक्री करताच पोलिसांनी आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये विशेष उपाख्य सोनू बाकट, रामफल वैश्य या २ होमिओपॅथी आधुनिक वैद्यांचा समावेश आहे. हे दोघेही मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील रहिवासी आहेत, तर या आधुनिक वैद्यांकडून इंजेक्शन घेऊन त्याची विक्री करणार्या सचिन गेवरीकर या तिसर्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.