शौर्याचे जागरण करणे ही काळाची आवश्यकता ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

शौर्यजागृती व्याख्यानाच्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा चिंचवड येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांचे संघटन करून केलेली स्वराज्याची स्थापना आणि क्रांतीकारकांनी इंग्रजांशी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिलेला लढा, हे शौर्य आहे. या शौर्याचे जागरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे; कारण वेळ कुणावर सांगून येत नाही; म्हणून आपण आपल्यामध्ये शौर्य आणि विजिगीषु वृत्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करूया. आज हिंदू समाज संघटित नसल्याने हिंदु धर्मावर आघात, महिलांवर अत्याचार, संतांवर आक्रमणे, मंदिरांचे सरकारीकरण, गडकिल्ल्यांचे इस्लामीकरण होऊन राष्ट्र-धर्माची हानी होत आहे. हे सर्व थोपवण्यासाठी, तसेच येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सबळ होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. पुणे येथे नुकत्याच आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते.

या वेळी श्री. कुलकर्णी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य घेण्यात येणार्‍या शौर्यजागृती वर्गाची माहिती सांगून त्या वर्गाला जोडण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमामध्ये शौर्य जागवणारी ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिके आणि स्वरक्षणाची तंत्रे ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. चारुशीला शिंदे यांनी केले. व्याख्यानाच्या शेवटी सर्वांनी प्रशिक्षणवर्गात सहभागी होणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगून ७ दिवसांच्या शौर्यवर्गाचे नियोजन करण्यात आले.

अभिप्राय

स्नेहल अत्तरदे – स्वरक्षण प्रशिक्षणाचे तंत्र प्रत्येकाने शिकलेच पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवले. तसेच शौर्यप्रसंग पाहून स्वतःचा बचाव कसा करायचा ? हे शिकायला मिळाले.

सारिका हिंगे – व्याख्यान ऐकून आत्मविश्‍वास वाढला. इच्छाशक्ती असेल, तर आपण काहीही करु शकतो, असे वाटले.