बेळगाव शहरातील खासगी रुग्णालयाची देयके पडताळण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना

दोषी आढळल्यास परवाना रहित करण्याची चेतावणी


बेळगाव – शहरातील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. खासगी रुग्णालयांनी अधिक देयक दिल्यास त्याची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिकारी, आरोग्य आधिकारी आणि ‘आय.एम्.ए.’चे पदाधिकारी यांची समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत झाला. अधिक देयक आकारणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची आणि परवाना रहित करण्याची चेतावणी या बैठकीत देण्यात आली. ज्या रुग्णालयांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते त्यांना नोटीस पाठवण्याचा आदेश आमदार अभय पाटील, अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी दिला.

रुग्णालये अधिक देयक देऊन लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचे दोन्ही आमदारांनी या वेळी सांगितले. ‘जनतेमध्ये प्रचंड रोष असून तो बाहेर पडण्याची वाट पाहू नका. संघटनेचा आधार घेऊन रुग्णालये बंद करण्याच्या धमक्या खपवून घेतली जाणार नाही’, असे मत दक्षिण बेळगावचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केले. आधुनिक वैद्यांनी व्यावसायिक न होता सेवाभावही जपणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी बैठकीत स्पष्ट केले.