एका विद्यार्थिनीचा लेखाद्वारे निष्कर्ष सादर
शालेय शिक्षणात ‘आध्यात्मिक साधनेद्वारे जीवन कसे जगावे ?’, हे न शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता येणे, आत्मविश्वास नसणे आदींद्वारे निराशा आणि काळजी वाढते. त्यामुळे समाजाला साधना शिकवून त्याची कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जायची सिद्धता करून घेणे, हाच योग्य उपाय आहे !
मडगाव, २१ मे (वार्ता.)- राज्यात चालू असलेल्या महामारीमुळे राज्यातील सर्व शाळांना ‘व्हर्च्युअल’ माध्यमातून आपला अभ्यासक्रम शिकवावा लागत आहे. सद्यःपरिस्थितीत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा आणि काळजी यांचे प्रमाण वाढत असतांना दिसत आहे. यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होणार आहे, असे विचार एबिगेल बार्रेटो या विद्यार्थिनीने एका लेखाद्वारे मांडले आहेत.
या लेखामध्ये म्हटले आहे, ‘‘शिक्षण खात्याने ‘ऑनलाईन’ पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खेळणे, सृजनशील गोष्टी करणे, इतर विद्यार्थ्यांसमवेत मिसळणे हे अशक्य झाले आहे. या विद्यार्थ्यांना घरी पुष्कळ वेळ उपलब्ध आहे; परंतु शारीरिक काम काही नसल्याने महामारीमुळे झालेल्या परिस्थितीला तोंड देणे विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. या मुलांचे समुपदेशन व्हावे, असे पालकांना वाटते; परंतु शाळाच बंद असल्याने ते करणेही कठीण झाले आहे. काही समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते व्हर्च्युअल माध्यमातून मुलांना समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही विद्यार्थ्यांना ‘आपण अभ्यासात मागे पडू’, असे वाटत आहे.’’ (विद्यार्थ्यांना साधनेद्वारे सकारात्मकतेने अडचणींना कसे सामोरे जायचे आदी शिकवले पाहिजे. तसेच स्वतःहून शिकणे, अडीअडचणीत शिक्षकांना किंवा शिक्षित लोकांना विचारणे आदीही उपाययोजना ही मुले सकारात्मकता निर्माण झाल्यास करू शकतील ! – संपादक)