गडचिरोली येथे १३ नक्षलवादी ठार !

नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार

गडचिरोली – जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस साहाय्य केंद्रातंर्गत पयडीच्या अरण्यामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवलेल्या गडचिरोली ‘सी ६०’ पथकाचे पोलीस आणि पोलीस अधिकारी यांचे अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील येथे आले आहेत.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबवण्यात येत आहे. अरण्यात अभियान चालू असतांना नक्षलवाद्यांचे शिबिर चालू असणार्‍या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार चालू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये १३ नक्षलवादी ठार झाले. चकमक अजूनही चालू असून मृतदेह एकत्र केले जात आहेत.