आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेनेे लिहीत आहे. १८ मे २०२१ या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील कार्य’ हा भाग पाहिला. आज या लेखमालिकेचा अंतिम भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/477926.html

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थूलरूपातील कार्य

३५. अन्य हिंदुत्वनिष्ठ वा सेवाभावी संघटनांच्या संदर्भातील कार्य

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

३५ अ. इतर सहभागी संस्थांना अधिक महत्त्व देणे : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अन्य हिंदुत्वनिष्ठ किंवा अन्य सेवाभावी संस्था यांच्यासह एकत्रित कार्य केले असेल, तेव्हा त्याची प्रसिद्धी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत देतांना कायम अन्य संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांची नावे आधी देऊन सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती, तसेच त्यांचे कार्यकर्ते यांची नावे शेवटी देण्याचा प्रघात त्यांनी पहिल्यापासून ठेवला आहे. त्यामुळे अन्य संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये कधीही ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी कार्याचे श्रेय घेतले’, अशी भावना निर्माण न झाल्याने संघटितपणे कार्य करणे सुलभ झाले. यामुळे संस्थेच्या साधकांचा अहंही मर्यादित रहाण्यास साहाय्य झाले.

३५ आ. अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांना साहाय्य करणे : अन्य आध्यात्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यासह कार्य करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा सहभाग केवळ कार्याशी मर्यादित न ठेवता, त्या संघटना आणि त्यांतील सदस्य यांना पूर्णतः स्वतःच्या अपत्यांप्रमाणेच आपले मानले आहे. एखाद्या साधकाला ते सर्वतोपरी साहाय्य करतात, तसेच साहाय्य त्यांनी अन्य संघटना आणि त्यांच्या सदस्यांनाही केले आहे.

३५ इ. अन्य संघटनांचे अस्तित्व कायम राखणे : सनातन संस्थेसह कार्य करणार्‍या अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक व्यासपिठावरून सांगितले आहे की, ‘सनातनसह कार्य करतांना आपले अस्तित्व झाकोळले जाणार किंवा मिटणार’, अशी भीती कधीच नसते. हे एकच व्यासपीठ असे आहे, जिथे प्रत्येक संघटना आपले अस्तित्व अबाधित राखून कार्य करू शकते. एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या संस्थापक-अध्यक्षांनी सनातनचे कार्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून अनुभवल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विनंती केली होती की, ‘आमची संघटना सनातनमध्ये विलीन करून घ्या.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना तसे करण्याची आवश्यकता नसल्याविषयी समजावले आणि पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे कार्य करण्यास प्रवृत्त केले.

३६. धर्माभिमान्यांच्या संदर्भातील कार्य

३६ अ. धर्माभिमान्यांना साधनेचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेणे : विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह कार्य करतांना त्यांचे नेते, कार्यकर्ते यांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेचे महत्त्व पटवून देऊन साधना करण्यासाठी प्रेरित केले आहे. ‘हिंदुत्वाचे कार्य साधनेच्या भक्कम पायावरच उभे राहू शकते’, हे पटल्याने त्यांच्यातील अनेकांनी साधना करण्यास आरंभ केला. त्यांचा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी त्याग झालेलाच असल्याने साधनेच्या प्रयत्नांची जोड मिळाल्याने त्यांतील काहींची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी पार करून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. साधनेची जोड मिळाल्याने त्यांना ईश्‍वराचे अधिक साहाय्य घेता आल्याने त्यांच्या हिंदुत्वाच्या कार्यालाही अधिक गती प्राप्त झाली.

३६ आ. अखिल भारतीय हिंदु अधिवेशन

‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित अधिवक्त्यांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

३६ आ १. अधिवेशनाचा उद्देश भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांना एका व्यासपिठावर आणणे, हा असणे : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांना एका व्यासपिठावर आणून हिंदुत्वासाठीचे कार्य सर्वमताने, पूर्वनियोजनासह  आणि संघटितपणे करणे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने वर्ष २०१२ मध्ये ‘प्रथम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले. त्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुढे ४ वर्षे म्हणजे २०१६ पर्यंत एकूण ५ अधिवेशने झाली. (त्यानंतर आतापर्यंत म्हणजे वर्ष २०१९ पर्यंत ८ अधिवेशने झाली आणि त्यानंतर वर्ष २०२० मध्ये एक ‘ऑनलाईन’ अधिवेशन झाले. या सर्वांनाही पुष्कळ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. – संकलक )

३६ आ २. अधिवेशनाचे स्वरूप : या अधिवेशनांना केवळ कार्यप्रवण हिंदुत्वनिष्ठांनाच निमंत्रण असते. प्रतीवर्षीच्या अधिवेशनात मागच्या अधिवेशनात ठरल्यानुसार त्या त्या संघटनेने ‘मागील वर्षभरात काय कार्य केले ?’, याचा आढावा व्यासपिठावरून द्यायचा असतो.

३६ आ ३. अधिवेशनांची कार्याच्या स्तरावरील फलनिष्पत्ती

अ. भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांची एकमेकांशी ओळख आणि जवळीक झाली.

आ. प्रत्येक मासाला (महिन्याला) सर्वांनी एकत्रिपणे राष्ट्रस्तरावर राष्ट्रीय हिंदु आंदोलनासारख्या कार्यक्रमातून एकत्रितपणे कार्य करणे चालू झाले.

इ. राष्ट्रीय, तसेच स्थानिक हिंदुत्वाच्या समस्यांवर एकत्रितपणे आणि यशस्वी लढा दिला जाऊ लागला.

ई. हिंदूंच्या एकमेकांच्या संकटकाळी (इतर संघटनांनी) त्यांच्या पाठीशी संघटित होऊन ठामपणे उभे रहाणे होऊ लागले.

३६ आ ४. अधिवेशनांची मानसिक स्तरावरील फलनिष्पत्ती

अ. भारतभरात अनेक ठिकाणी होत असलेल्या संघटित कार्यामुळे यापूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो, अशा विषयांतही अभूतपूर्व यश मिळू लागले.

आ. सर्वांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यामुळे सर्वांची कार्यपूर्तीविषयी निश्‍चिती झाली आहे.

इ. सतत कार्यरत रहाण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांंच्या उत्साहात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

३६ आ ५. अधिवेशनांची आध्यात्मिक स्तरावरील फलनिष्पत्ती

अ. ‘भारतातील सर्व समस्यांवरील एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हा आहे आणि ईश्‍वरेच्छेने तो साध्य होणारच आहे’, ही श्रद्धा धर्माभिमान्यांमध्ये निर्माण होत आहे.

आ. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या अधिवेशनांच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांना साधनेचे महत्त्व लक्षात येऊन त्यांनी उत्तम प्रकारे साधना करण्यास आरंभ केला. काहींनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर ईश्‍वरेच्छा ओळखता येणे आणि ईश्‍वराची कृपा ग्रहण करता येणे, यांची क्षमता वाढल्याने हिंदुत्वाच्या कार्याची फलनिष्पत्तीही तेवढ्या पटींनी वाढते.

३६ इ. धर्माभिमान्यांमध्ये झालेला पालट

१. आरंभीच्या अधिवेशनांत बोलतांना हिंदुत्वनिष्ठांचे बोलणे बरेच मानसिक स्तरावरचे आणि अहंयुक्त असे; परंतु पुढे-पुढे त्यांच्यात नम्रता आणि भावही निर्माण होत असल्याचे दिसून आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना अनेक धर्माभिमान्यांचा कंठ दाटून येतो.

३७. प्रार्थना

माझ्या अज्ञानामुळे, तसेच विस्तारभयामुळे या लेखात मांडलेल्या सूत्रांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक सूत्रे मांडणे राहिले आहे. जे अल्प प्रमाणात येथे मांडले आहे, त्यातूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपणा सहज लक्षात येतो. या सर्व गुणवैशिष्ट्यांतून मला, तसेच इतरांनाही शिकता येऊन ‘आमच्यातही हे गुण यावेत’, यासाठी त्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे सर्व प्रयत्न आमच्याकडून करवून घ्यावेत’, अशी गुरुमाऊलीच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ (समाप्त)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)