‘तौक्ते’ चक्रीवादळाचा जोर ओसरला : जिल्ह्यात ५ कोटी ७७ लाख रुपयांच्या हानीचा प्राथमिक अंदाज

  • जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

  • कोकण रेल्वेमार्गावरील ६ गाड्या रहित

सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत अतीवृष्टी झाली. या पावसामुळे घरे, गोठे, शेती, बागायती यांसह खासगी, तसेच शासकीय मालमत्तेची हानी झाली आहे. या वादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. १७ मे या दिवशी वादळ आणि पावसाचा जोर ओसरल्याने आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अनुमाने ५ कोटी ७७ लाख रुपयांची विविध प्रकारची हानी झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या वादळामुळे झालेल्या हानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.

वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडली, दरड कोसळली, घरांच्या भिंती कोसळल्या, तसेच विद्युत् पुरवठा खंडित झाला होता. वीजवितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे, तर प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्याकडून रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ कोटी ७७ लाख रुपयांची हानी

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अनुमाने ५ कोटी ७७ लाख ४५ सहस्र ११७ रुपयांची हानी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या हानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण २ सहस्र ६० घरांची अंशतः, तर १२ घरांची पूर्णतः हानी झाली आहे. १३९ गोठे, १९ शाळा, ११ शासकीय इमारती, १३ शेड्स, ४ सभागृह आणि इतर ५३ ठिकाणी अंशतः हानी झाली आहे. वीजवाहिन्यांचे ९८ खांब पूर्णत: पडले आहेत, तर ७८२ खांबांची काही प्रमाणात हानी झाली. जिल्ह्यात एकूण ९०७ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

चक्रीवादळामुळे कोकण  रेल्वेमार्गावरील ६ गाड्या रहित

चक्रीवादळाच्या धोक्यामुळे दोन दिवस कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या ६ गाड्या रहित करण्यात आल्या. कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १६ आणि १७ मे या दिवशी धावणार्‍या तिरूनेलेवली-जामनगर (गाडी क्रमांक ०९५७७), वास्को-कुळे पॅसेंजर (गाडी क्रमांक ०७३३९, ०७३४२, ०७३४३, ०७३४४), तसेच ओखा-एर्नाकुलम् स्पेशल (गाडी क्रमांक ०७३४२) या गाड्या रहित

करण्यात आल्या.