सांगली – वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता भाजपच्या वतीने आमदार श्री. सुधीर गाडगीळ युवा मंच संचालित पंडित दीनदयाळ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या सेंटरची माहिती देतांना आमदार श्री. गाडगीळ म्हणाले, ‘‘माझी कार्यपद्धती राजकारण अल्प आणि समाजकारण अधिक अशी असते. सध्याची कोरोनाची लाट गंभीर असून रुग्णांची गैरसोय होत आहे, हे पाहून आम्ही ‘कोविड सेंटर’ चालू करण्याचा निर्णय घेतला. येथे ५० खाटांची सोय करण्यात आली असून भरती झालेल्या रुग्णांना उपचारांसमवेत चहा, अल्पाहार आणि भोजनही देण्यात येणार आहे. रुग्णांसाठी ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.’’ याप्रसंगी शहराध्यक्ष श्री. दीपक शिंदे, सर्वश्री शेखर इनामदार, प्रकाशतात्या बिरजे, दीपक माने, पांडुरंग कोरे, विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्षा (सौ.) स्वाती शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.