राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे

सातारा, १३ मे (वार्ता.) – खटाव तालुक्यातील पडळ येथील साखर कारखान्यावरील हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलिसांनी अटक केली. वडूज पोलिसांनी त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यानंतर घार्गे यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पडळ साखर कारखान्यावरील हत्येप्रकरणी वडूज पोलिसांनी ७ ते ८ जणांवर गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्यातील संशयित आमदार प्रभाकर घार्गे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना ७ मे या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले होते; मात्र ते उपस्थित न रहाता मुदत वाढीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळत न्यायालयाने घार्गे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. १२ मे या दिवशी वडूज पोलिसांनी त्यांना सातारा येथे अटक केली.