सातारा येथे जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर हाणामारी

महिला पोलिसासह ३ जण घायाळ

सातारा – येथील जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर वाहनातून आलेल्या काही जणांनी काठ्या आणि लोखंडी गज यांचा उपयोग करत २ जणांना हाणामारी केली. या हाणामारीत महिला पोलीस कर्मचार्‍यासह ३ जण घायाळ झाले आहेत. यामुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. थोड्या वेळासाठी वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाइक यांंमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. (रुग्णालय परिसरात पुरेसा पोलिसांचा बंदोबस्त नसतो का ? – संपादक)

सातारा कोविड सेंटरच्या आवारात १२ मे या दिवशी दुपारी वाहनातून काठ्या आणि लोखंडी गज घेऊन काही जण गाडीतून उतरले. त्यांनी या परिसरात उपस्थित रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये गर्दीत लपून बसलेल्या दोघांना शोधून काढले आणि मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणारे वाहनातून निघून गेले. या वेळी २ जण घायाळ झाले. ही मारहाण सोडवायला गेलेली महिला पोलीस कर्मचारी घायाळ झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. मारहाण झालेल्या आदिक बैजू काळे आणि एकनाथ बैजू काळे या दोघांना पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोघांपैकी एक जण गंभीर घायाळ असून कौटुंबिक वादातून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनावर उपचार होणार्‍या रुग्णालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी गर्दी असते. या परिसरात झालेल्या प्रकाराने परिसरातील सगळेच अचंबित आणि भयभीत झाले. यामुळे कोविड रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला आहे. या ठिकाणी रुग्णालयातील ४०० रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आजूबाजूला बसून असतात. त्यामुळे या परिसरात कोणालाही अनावश्यक प्रवेश देऊ नये. दरवाजातून आत येणार्‍या प्रत्येकाची नोंद करावी, अशी मागणी रुग्णांचे नातेवाइक करत आहेत.