दळणवळण बंदी त्वरित हटवली जाईल, अशी अपेक्षा करू नका ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील दळणवळण बंदी वाढवण्याचे आरोग्यमंत्र्यांकडून संकेत !

आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – निर्बंध हळूहळू न्यून करण्याचे प्रयत्न होतील, असे माझे अनुमान आहे; पण पूर्ण दळणवळण बंदी काढून १०० टक्के मोकळीक होईल, असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. दळणवळण बंदी त्वरित हटवली जाईल, अशी अपेक्षा करू नका, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ११ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘१२ मे या दिवशी मंत्रीमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या वेळी मंत्रीमंडळाच्या सदस्यांसमवेत चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. सध्या राज्यात नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दळणवळण बंदी लागू आहे, तसेच अनेक जिल्हे सध्या संपूर्ण दळणवळण बंदी करण्याच्या सिद्धतेत आहेत.’’