६० टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नवीन पनवेल (जिल्हा रायगड) येथील कु. सनातन बुगडे (वय १५ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सनातन बुगडे हा आहे !

 

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. सनातन बुगडे

१. ‘कु. सनातन नेहमी आनंदी आणि समाधानी असतो. ‘सनातन’ या त्याच्या नावातच चैतन्य आहे. त्याचे नाव उच्चारतांना नेहमी आनंद मिळतो.’ – श्री. संदीप नलावडे आणि सौ. वीणा म्हात्रे

२. ‘सनातनच्या बोलण्यात सहजता, नम्रता, आदर आणि प्रेमभाव आहे.’ – सौ. वंदना मेणशी

३. ‘तो शांत स्वभावाचा आहे. त्याने कधी हट्ट केल्याचे आम्ही पाहिले नाही.’ – सौ. शरयू मुळे आणि सौ. पुष्पा चौगुले

४. ‘तो डोक्याला शेंडी ठेवून शाळेत जातो.’ – सौ. वीणा म्हात्रे

५. समंंजसपणा

अ. ‘लहानपणी सनातनची आई आमचा बालसंस्कारवर्ग घ्यायला यायची. त्या वेळी सनातन त्यांच्या समवेत असायचा. तो खेळायला गाड्या घेऊन यायचा. तेव्हा मी आणि इतर मुले त्याच्या गाडीशी खेळायचो. त्या वेळी तो आम्हाला सांगायचा ‘‘आपण बालसंस्कारवर्गात आहोत. त्यामुळे आता खेळायला नको.’’ त्याने हे सांगितल्यावर आम्हाला पुष्कळ चांगले वाटायचे.’ – कु. सोहम् संदीप नलावडे

आ. ‘त्याची आई त्याला शाळेतून घेऊन यायची आणि सत्संगाला बसायची. तेव्हा तो आणलेला खाऊ खायचा आणि सत्संग संपेपर्यंत अभ्यास करत बसायचा. साधकांची मुले मस्ती करायची. तेव्हा तो त्यांना समजावून सांगायचा, ‘‘सत्संग चालू आहे ना ?’’ – सौ. शरयू मुळे आणि सौ. पुष्पा चौगुले

६. कु. सनातनच्या सहवासात रहायला आवडणे

‘मी आईच्या समवेत सत्संगात जायचो. त्या वेळी इतर मुले मस्ती करायची. तेव्हा मला सनातनच्या सहवासात रहायला आवडायचे. तो पुष्कळ चांगला मुलगा आहे आणि माझा चांगला मित्रही आहे. तो मला समजून घेतो आणि साधनेत साहाय्य करतो.

७. तहान-भूक विसरून आनंदाने सेवा करणे

‘तो या वयात इतर मुलांप्रमाणे खेळणे, बागडणे, मौज-मजा करणे’, असे न करता, हिंदु राष्ट्र जागृती सभा, आंदोलने आणि इतर उपक्रम यांत सातत्याने सहभागी होतो. त्या वेळी तो स्वतःची तहान-भूक विसरून आनंदाने सेवा करतो.’ – कु. सोहम् संदीप नलावडे

८. शाळेत चिनी ‘अ‍ॅप’वर शिकवले जात असल्याचे समजताच ते बंद करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यानंतर शाळेने चिनी ‘अ‍ॅप’ बंद करण्याचा निर्णय घेणे

८ अ. ‘चिनी अ‍ॅप’वर अभ्यास न करण्याच्या मतावर ठाम असणे : ‘सनातन दहावीला असतांना त्याच्या शाळेमध्ये एका चिनी ‘अ‍ॅप’वर ‘ऑनलाइन’ वर्ग चालू झाले. तेव्हा त्याने हे ‘अ‍ॅप’ चिनी असल्याने एकाही वर्गाला स्वतःला जोडून घेतले नाही. ‘मी माझा अभ्यास ‘यू ट्यूब’ला जोडून पूर्ण करीन’, या मतावर तो ठाम होता.

८ आ. स्वतः चिनी ‘अ‍ॅप’ न जोडणे आणि ‘अन्य कुणी हे ‘अ‍ॅप’ वापरत आहे का ?’, याविषयी माहिती काढणे : ‘मी चिनी ‘अ‍ॅप’जोडत नाही; पण ‘माझी पूर्ण शाळा हे ‘अ‍ॅप’ वापरत आहे’, हे चुकीचे आहे’, असे विचार त्याच्या मनात आले, तसेच ‘हे ‘अ‍ॅप’ अजून कुठे वापरत असतील का ?’, याची माहिती तो काढू लागला. त्यासाठी त्याने आपले नातेवाईक आणि मुख्याध्यापिका असलेल्या एक साधिका यांच्याकडे ‘तुमच्या शाळेत कुठे कुठे चिनी ‘अ‍ॅप’ वापरले जाते ?’, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?’, अशी चौकशी चालू केली.

८ इ. हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना ‘शाळेत चिनी ‘अ‍ॅप’ वापरले जात असल्याविषयी निवेदन देऊ शकतो का ?’, असे विचारणेे आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटावर त्या विरोधात पोस्ट टाकणे : त्याने रायगड जिल्हा ‘हिंदु जनजागृती समिती’च्या समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर यांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘गुरुजी, आमच्या शाळेत काही ठिकाणी चिनी ‘अ‍ॅप’चा वापर चालू आहे, तरी आपण ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने निवेदन देऊ शकतो का ?’’ त्यावर गुरुजी म्हणाले, ‘‘आपल्याला पालकांच्या स्वाक्षर्‍या (सह्या) लागतील.’’ त्याने त्याप्रमाणे प्रयत्न चालू केले. त्याने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटावर त्या विरोधात ‘पोस्ट’ टाकली.

८ ई. ‘मित्रांमध्ये जागृती करूया’, असा विचार करून याविषयी मित्रांना सांगणे आणि दोन मित्रांनी त्यांच्या भ्रमणभाषमधून चिनी ‘अ‍ॅप’ काढून टाकणे : सनातनने परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, तुम्हीच आता मला साहाय्य करा. शाळेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कुणीच प्रतिसाद देत नाही आणि वर्ग चालू आहे.’ नंतर त्याच्या मनात विचार आला, ‘आपण मित्रांमध्ये जागृती करूया.’ मित्रांना सांगितल्यावर त्यांतील दोन मित्रांनी त्यांच्या भ्रमणभाषमधून चिनी ‘अ‍ॅप’ काढून टाकले.

८ उ. श्री. आणि सौ. बुगडे यांनी प्रार्थना करून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटावर प्रबोधनात्मक लिखाण टाकल्यावर १२ पालकांनी त्याला चांगला प्रतिसाद देणे : त्याने एका मित्राला प्रबोधनात्मक लिखाण पाठवले आणि त्याला ते ‘व्हॉट्स अ‍ॅप’ गटावर टाकायला सांगितले. त्या लिखाणाला २ – ३ पालकांनी प्रतिसाद दिला. त्याला पुष्कळ आनंद झाला. त्याने मला सांगितले, ‘‘आई, तूही तुझ्या गटावर एक ‘पोस्ट’ टाक.’’ मी आणि श्री. बुगडे यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून एक ‘पोस्ट’ सिद्ध केली आणि ती गटावर टाकली. ती ‘पोस्ट’ वाचून १२ पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. ते पाहून माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ‘सनातनच्या तळमळीमुळे गुरुमाऊली शब्दरूपाने अवतरली आणि तिने पालकांच्या मनावरील आवरण दूर केले अन् त्यांना या प्रबोधनात सहभागी होण्यास उद्युक्त केले’, असे विचार माझ्या मनात आले आणि मन कृतज्ञतेने भरून आले.

८ ऊ. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील लिखाण वाचून बैठक घेण्याचे ठरवणे : दुसर्‍या दिवशी शिक्षकांना भ्रमणभाष करून ‘हा ‘अ‍ॅप’ कधी बंद होईल ?’, असे विचारले. तेव्हा शिक्षक म्हणाले, ‘‘आम्ही ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पोस्ट वाचल्या आहेत आणि उद्या मुख्याध्यापिका यावर बैठक घेणार आहेत. बैठकीमध्ये निर्णय झाला की, कळवतो.’’

८ ए. मुख्याध्यापकांनी चिनी ‘अ‍ॅप’ बंद करून ‘गूगल शीट’वर वर्ग चालू करण्याचा निर्णय घेणे : आमचे शिक्षकांशी बोलणे झाले, तरी ४ दिवस चिनी ‘अ‍ॅप’वर वर्ग चालू होते; म्हणून ‘आपणच मुख्याध्यापकांशी बोलावे’, असा विचार केला. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सर्व ऐकून घेतले आणि संध्याकाळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सूचना पाठवल्या ‘आपल्याला चिनी ‘अ‍ॅप’ बंद करून ‘गूगल शीट’वर वर्ग चालू करायचे आहेत.’ हे वाचल्यावर ‘गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’  – सौ. मांडवी बुगडे (आई), नवीन पनवेल, रायगड. (३.७.२०२०)

कु. सनातन बुगडे (वय १५ वर्षे) याने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याच्या संदर्भात साधिकेला मिळालेली पूर्वसूचना

कु. सनातन याच्याशी बोलल्याने मनाला आनंद मिळणे आणि त्यानंतर त्याची ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित होणे

‘एकदा मी साधनेच्या संदर्भात बोलण्यासाठी सौ. बुगडे यांना (सनातनच्या आईला) संपर्क केला होता; पण त्या व्यस्त असल्यामुळे माझे सनातनशी बोलणे झाले. त्याच्याशी बोलल्यामुळे माझ्या मनाला वेगळाच आनंद मिळाला आणि १४.८.२०२० या दिवशी ‘सनातनने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, अशी आनंदवार्ता सौ. लोटलीकरकाकूंनी दिली. तेव्हा ‘मला त्याच्याशी बोलतांना आनंद का मिळत होता ?’, याची उकल आली.’

– सौ. वंदना मेणशी

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक