कोरोनाबाधित मृतदेहांवरील कपडे चोरून त्यावर ‘ब्रॅण्डेड’ आस्थापनांचे लोगो लावून ते विकणारी टोळी अटकेत !

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांकडून समाजाला साधनेचे धडे तर दूरचेच; पण साधे नैतिक मूल्यांचेही धडे न दिल्याचे फलित ! मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या  अशा विकृत मानसिकता असलेल्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !

बागपत (उत्तरप्रदेश) – स्मशान घाटावर करोनाबाधित मृत व्यक्तींच्या शरिरावरील कपड्यांवर ‘ब्रॅण्डेड’ आस्थापनांचे लोगो लावून ते विकणार्‍या ७ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. श्रीपाल जैन, आशीष जैन, राममोहन, अरविंद जैन, ईश्‍वर, वेदप्रकाश आणि मोबीन अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या संख्येने कपडे कह्यात घेतले आहेत.

बडौत पोलीस ठाण्यातील निरीक्षक अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ मे या दिवशी दळणवळणबंदीच्या संदर्भात पोलीस तपासणी चालू असतांना एका गाडीमध्ये ‘ब्रॅण्डेड’ कपडे असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना यासंदर्भात शंका आल्याने त्यांनी या कपड्यांच्या खरेदीसंदर्भातील देयके आणि इतर कागदपत्रे मागितली; मात्र गाडी घेऊन जाणार्‍यांकडे गाडीतील मालासंदर्भात काहीच कागदपत्रे नव्हती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी आम्ही कोरोना मृतांच्या शरिरावरील कपडे चोरून विकत असल्याची स्वीकृती दिली. मागील २ वर्षांपासून त्यांचे हे उद्योग चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.