ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा महिलेचा आरोप


ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) – आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर यांच्या कोरोना रुग्णालयात माझे पती धोंडीराम वसंतराव पाटील यांचा रुग्णालय प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, हलगर्जीपणा, तसेच दायित्वशून्यता यांमुळे मृत्यू झाला आहे. तरी याविषयी आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर यांची चौकशी होऊन मला न्याय मिळावा, या मागणीचे निवेदन धोंडीराम पाटील यांच्या पत्नी रूपाली पाटील यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे दिले आहे. न्याय न मिळाल्यास वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागू, तसेच प्रसंगी न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी रूपाली पाटील यांनी दिली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ एप्रिल या दिवशी धोंडीराम पाटील यांना आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर यांच्या रुग्णालयामध्ये भरती केले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना बरे वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी आणि कुटुंबियांनी घरी जाण्यासाठी अनुमती मागितली होती; परंतु २ मे या दिवशी अचानक रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने पाटील यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेला आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कारणीभूत आहेत. त्यामुळे आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.

माझ्यावरील आरोपांत तथ्य नाही ! – आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर

कापूसखेड (तालुका वाळवा) – येथील रुग्ण धोंडीराम पाटील हे माझ्याकडे भरती होण्यापूर्वी १५ दिवसांपासून घरीच होते. त्यांना ताप, सर्दी, खोकला आणि कणकण असा त्रास होता. माझ्याकडे आले, तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी ६० होती. त्यानंतर त्यांच्यावर ‘व्हेंटिलेटर’ लावून कोरोनाचे उपचार चालू होते. शेवटचे ४ ते ५ दिवस त्यांना दम लागत होता. त्या वेळी ‘एक्स-रे’ काढल्यावर त्यांच्या दोन्ही फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूमोनियाची लक्षणे दिसून आली. परिणामी २ मे या दिवशी दुपारी ४.३० वाजता ते मृत्यूमुखी पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात दंगा केला आणि कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. यानंतर रुग्णालयाचे देयक न देताच मृतदेह घेऊन तेे निघून गेले. त्यामुळे पाटील कुटुंबीय करत असलेल्या कोणत्याही आरोपांमध्ये तथ्य नाही, असे आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर यांनी सांगितले आहे.