मृतदेह नातेवाइकांना न दिल्याने पुणे येथील मायमर हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा नोंद

देयक न भरल्याने रुग्णालयाकडून अडवणूक !

तळेगाव, (पुणे) ९ मे – उपचारांचे देयक भरू न शकल्यामुळे मृतदेह नातेवाइकांना दिला नाही; म्हणून तळेगाव येथील मायमर हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याने दिली आहे. या प्रकरणी सुधीर गणेश लोके यांनी ७ मे या दिवशी तक्रार नोंद केली होती.

हा प्रकार शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उघडकीस आणला. तसेच ७ मे या दिवशी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुग्णालयाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. पवार यांनी यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.