भारतात अजूनही माणूसकी शिल्लक आहे, याचे हे एक उदाहरण ! अशा वृत्तीचे लोक देशात दुर्मिळ झाले आहेत, हेही तितकेच खरे !
जयपूर (राजस्थान) – पाली येथील एका ६० वर्षांच्या लेहर कंवर या कोरोनाबाधित वृद्ध महिलेने एका युवकासाठी बांगर रुग्णालयातील स्वतःची खाट सोडली. लेहर कंवर या स्वतः ऑक्सिजनच्या साहाय्यावर होत्या; मात्र तरीही या युवकाला प्रचंड त्रास होत असल्याचे दिसताच त्यांनी स्वतः खुर्चीवर बसूनच ऑक्सिजन घेतला.
१. लेहर कंवर यांना ४ घंट्यांच्या प्रतीक्षेनंतर या रुग्णालयात खाट उपलब्ध झाली होती. त्याच वेळी त्यांचे लक्ष एका गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका युवकावर गेली. बाबूराम नावाच्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती आणि त्याची प्रकृती गंभीर होती. ही माहिती लेहर कंवर यांना मिळाल्यावर त्यांनी त्यांची खाट बाबूराम यांना देण्यास सांगितले.
२. लेहर म्हणाल्या, ‘‘मी माझ्या वाट्याचे जीवन जगले. माझ्या मुलांची लग्नदेखील झाली; मात्र या व्यक्तीची लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करा. मी आणखी काही वेळ व्हिलचेअरवर बसून वाट पहाते.’’