वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरातील विशाल अक्षयवट वृक्ष प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पडला !

  • महंत आणि स्थानिक नागरिक यांच्यात संतापाची लाट  

  • दोषींवर कारवाईची महंत परिवाराची मागणी

हिंदूंच्या आध्यात्मिक ठेव्याची अशा प्रकारे हेळसांड करणार्‍या संंबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

मूळासह उखडून पडलेला अक्षयवट वृक्ष

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरातील ‘अक्षयवट हनुमान मंदिरा’जवळील विशाल अक्षयवट वृक्ष २८ एप्रिल या दिवशी कोसळला. ‘काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्षयवट पडला’, असा आरोप वाराणसीच्या महंत परिवाराने केला आहे. या घटनेला दोषी असणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. येथे चालू असलेल्या विश्‍वनाथ मंदिर कॉरिडोरच्या क्षेत्रात हा वृक्ष होता.

१. महंत परिवाराची अनुमती, तसेच काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाचे लेखी आश्‍वासन घेऊन येथे सौंदर्यीकरण चालू करण्यात आले होते. या वेळी हा वृक्ष सुरक्षित ठेवण्याचे निर्देश महंत परिवाराने दिले होते. अधिकार्‍यांनीही ‘काळजी घेऊ’, असे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात हलगर्जीपणा करण्यात आल्याने हा वृक्ष पडला. यामुळे महंत परिवार आणि काशीमधील नागरिक यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन तक्रार करण्यात येणार असल्याचे महंत परिवाराकडून सांगण्यात आले आहे.

२. एकीकडे आपण ऑक्सिजनच्या रक्षणाविषयी चर्चा करतो, तर दुसरीकडे अशा प्रकारे प्राचीन गोष्टींना नष्ट करत आहोत. या घटनेसाठी जे कुणी दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया काशी विद्वत परिषदेचे महामंत्री प्रा. रामनारायण द्विवेदी यांनी व्यक्त केली.

अक्षयवट कोसळणे निंदनीय ! – स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

अक्षयवट वृक्ष पडणे निंदनीय आहे. यापूर्वी पूर्व गोविन्देश्‍वर महादेव मंदिराजवळील पिंपळ वृक्ष तोडण्यात आला होता.

अक्षयवट वृक्षाचे महत्त्व

देशात केवळ काशी, गया आणि प्रयाग येथे अक्षयवट आहेत. गया येथे या वृक्षाच्या खाली बसून पिंडदान केले जाते, प्रयागराज येथे मुंडन केले जाते, तर काशी येथे दंडी स्वामी यांना भोजन देण्याची प्रथा आहे. या तिन्ही ठिकाणी हनुमानाचे मंदिर आहे. गया येथे बसलेला, प्रयागराज येथे पहुडलेला आणि काशी येथे उभा असलेला हनुमान आहे.