जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी अग्नीसुरक्षेचे लेखापरीक्षण करून घेण्याचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा आदेश !

विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे – राज्यातील कोविड रुग्णालयांमध्ये अपघात होऊन रुग्णांचा बळी जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील सर्व रुग्णालयांना अग्नीसुरक्षेचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. यासाठी बांधकाम, अग्नीशमन, नियोजन, विद्युत् आदी विभाग आणि आरोग्य विभागातील अधिकारी यांना एकत्र घेऊन पथक सिद्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. रुग्णालयांमध्ये शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांमुळे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण होणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. या लेखा परीक्षणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित नियोजन प्राधिकरणाचे अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची समिती नेमण्यात आली असून त्यांनी तात्काळ लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचा आदेश दिला आहे.