पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक

नगर – राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय कुलथे याला उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून अटक केली असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

राहुरी येथील एका साप्ताहिकाचे संपादक आणि माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल या दिवशी अपहरण झाले होते. त्यानंतर काही घंट्यातच त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आरोपी लाला उपाख्य विक्रम माळी आणि तौफिक मुक्तार शेख यांना अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आले. त्यांनी मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे, अक्षय कुलथे यांना अटक केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.