पणजी, २७ एप्रिल (वार्ता.)- सिरम इन्स्टिट्यूटकडून लस उपलब्ध झाल्यास गोव्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोस डिसा यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘१ मेपासून भारत सरकार ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी गोव्यातील संख्येच्या ५० टक्के प्रमाणात लसींचा पुरवठा करेल. गोवा राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी गोवा शासनाने सिरम इन्स्टिट्यूटकडे ५ लाख लसींची मागणी केली आहे; परंतु केंद्रशासनाने दिलेल्या मागणीची पूर्तता करावी लागणार असल्याने सध्या लसीचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे सिरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.’’