रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करणार्‍या नवी मुंबईतील आधुनिक वैद्यांसह एकाला अटक !

रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करणे म्हणजे आपत्काळात मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच प्रकार !

नवी मुंबई, २४ एप्रिल (वार्ता.) – रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करण्यात साहाय्य करणार्‍या येथील एका कोविड रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

सर्वजीत कमलकांत सिंग (वय २७ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आधुनिक वैद्यांचे नाव आहे. खारघर येथे एकजण रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांनी संबंधिताची पडताळणी केल्यावर त्याच्याकडे २ इंजेक्शने आढळून आली. ही इंजेक्शने ४० सहस्र रुपयांना विकणार असल्याचेही त्याने मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. हरपिंदर कपूर सिंग (वय ४१ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही इंजेक्शने त्याने नवी मुंबईतील एका कोविड रुग्णालयातून तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्या साहाय्याने काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी आणल्याचे मान्य केले. त्यानंतर संबंधित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनाही अटक करण्यात आली.