समाजातील तथाकथित संतांसह नामजप केल्याचा साधकांवर झालेला परिणाम

अध्यात्मशास्त्राविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘समाजातील जवळजवळ प्रत्येकालाच वाईट शक्तींचा त्रास असतो. वाईट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतात, तसेच जीवनात इतर अडचणीही येतात. दुर्दैवाने बहुतेक जण वाईट शक्तींच्या त्रासांविषयी अनभिज्ञ असतात. समाजातील तथाकथित संत लोकांच्या मायेतील अडचणी सोडवतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे पुन:पुन्हा जातात. मायेतील अडचणी न संपणार्‍या असतात. तसेच वरवर केलेल्या तात्कालिक उपायांचा परिणाम फार दिवस टिकत नाही. त्यामुळे वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी नामजप-साधना करणे, हाच प्रभावी उपाय आहे. काही तथाकथित संतांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास असल्याने त्यांच्यातील वाईट शक्ती संधीचा अपलाभ घेतात. वाईट शक्ती संतांचे मन आणि बुद्धी यांवर काळे आवरण आणतात अन् त्यांच्या माध्यमातून लोकांना चुकीचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे लोकांना लाभ होण्याऐवजी त्यांची आध्यात्मिकदृष्ट्या हानी होते.

एका राज्यातील एका तथाकथित संतांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी सनातनच्या आश्रमात नामाचा एक प्रकार प्रस्तुत केला. यामध्ये त्या संतांनी टाळ वाजवत ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपाचे उच्चारण केले आणि साधक त्यांच्या मागून तो नामजप म्हणत होते. ‘संतांसह नामजप केल्याचा साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेले २ साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले २ साधक सहभागी झाले होते. या प्रयोगात चारही साधकांनी संतांसह ३० मिनिटे नामजप केला. प्रयोगापूर्वी आणि नंतर त्या सर्वांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या प्रयोगाचा त्या सर्वांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – या प्रयोगाचा संत आणि साधक यांच्यावर पुष्कळ नकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – ‘ऑरा स्कॅनर’ने ४० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. प्रयोगानंतर संतांमधील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांमध्ये पुष्कळ वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

२. प्रयोगानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांमध्ये पुष्कळ वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

३. प्रयोगानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधिकांमधील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली.

सौ. मधुरा कर्वे

२. निष्कर्ष

या प्रयोगाचा संत आणि साधक यांच्यावर पुष्कळ नकारात्मक परिणाम झाला.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. या प्रयोगानंतर संतांमधील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होणे : या प्रयोगात प्रस्तुत करणारे तथाकथित संत हे देवी उपासक आहेत. त्यांची थोडीफार साधना आहे. त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळल्या. (‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीभोवतीचे त्रासदायक आवरण दर्शवते, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या देहात वाईट शक्तींनी साठवलेली त्रासदायक शक्ती दर्शवते.) त्यांच्यात अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. या प्रयोगात खरे तर देवाच्या नामातून चैतन्य मिळून सर्वांना आध्यात्मिक लाभ होणे अपक्षित होते; पण येथे तसे झाले नाही. उलट सर्वांवर आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. याचे कारण हे की, या प्रयोगामध्ये तथाकथित संतांकडून पुष्कळ त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित झाली. त्यांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींनी या संधीचा अपलाभ घेऊन सर्वांवर त्रासदायक शक्ती सोडली. त्यामुळे सर्वांवर पुष्कळ नकारात्मक परिणाम झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ आ. प्रयोगानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होणे : या साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. प्रयोगाच्या वेळी वाईट शक्तींनी सोडलेली त्रासदायक शक्ती ग्रहण करण्यासाठी साधकांची त्रासदायक शक्तींची स्थाने कार्यरत झाली आणि त्यांनी ती त्रासदायक शक्ती ग्रहण केली. त्यामुळे प्रयोगानंतर साधकांतील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाल्याचे दिसून आले.

३ इ. प्रयोगानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकांतील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होणे : या दोन्ही साधिकांना आध्यात्मिक त्रास नाही. त्यांच्या भोवती काही प्रमाणात त्रासदायक आवरण होते. प्रयोगाच्या वेळी वाईट शक्तींनी सोडलेल्या त्रासदायक शक्तीमुळे साधिकांभोवती त्रासदायक आवरणात वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.१२.२०२०)

ई-मेल : [email protected]


समाजातील तथाकथित संत आणि खरे संत यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

कु. प्रियांका लोटलीकर

‘ज्ञानी म्हणूनी तू जगी मिरविसी । इतर जनांसी सावध करिसी । स्वतः आपणा कसा फसविसी । आहे का हृदयी तुझ्या हरिनाम ॥’ असे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांनी एका भजनपंक्तीत मार्गदर्शन करतांना म्हटले आहे. या ओळी सांप्रतकाळातील तथाकथित साधू- संत आणि स्वतःला महाराज म्हणवून घेणार्‍यांना तंतोतंत लागू पडतात. प.पू. बाबांचे हे मार्गदर्शनपर बोल अशांना केवळ सावध करणारे नसून अंतर्मुख करून दिशादर्शन करणारेही आहेत.

१. प्रयोगासंदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे

प्रयोगानंतर साधकांनी सांगितले, ‘या प्रयोगात संतांसह नामजप करतांना आम्हाला कंटाळवाणे वाटत होते, आमच्यातील नकारात्मकता वाढत होती. ‘ते संत करत असलेला नामजप ऐकू नये’, असे वाटत होते. तसेच स्वतःभोवती असलेल्या आवरणात पुष्कळ वाढ झाल्याचे जाणवले.’ (सनातनचे साधक योग्य मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याने त्यांना हा भाग लक्षात आला. समाजातील बहुतांश लोक साधना करत नसल्याने त्यांना हा भाग लक्षात येत नाही. – संकलक)

२. तथाकथित संतांनी स्वतःची साधना वाढवण्यासाठी खर्‍या संतांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असणे

तथाकथित संतांना तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने त्यांची स्वतःची, तसेच प्रयोगात सहभागी साधकांची आध्यात्मिकदृष्ट्या केवढी हानी झाली, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले. रामनाथी आश्रमातून प्रस्थान करण्यापूर्वी तथाकथित संतांची आश्रमातील एका संतांशी भेट झाली. भेटीनंतर तथाकथित संतांवरील त्रासदायक आवरण नाहीसे होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होऊन ती ३६ मीटर झाल्याचे निरीक्षणातून दिसून आले. यातून ‘तथाकथित संतांनी स्वतःची साधना वाढवण्यासाठी खर्‍या संतांचे मार्गदर्शन घेणे किती आवश्यक आहे’, हे लक्षात येते. तसेच लोकांनी समाजातील तथाकथित संतांपेक्षा खर्‍या संताकडे जाऊन साधनेविषयी मार्गदर्शन घेणे किती आवश्यक आहे, हेही लक्षात येते.

३. खरे संत कसे ओळखायचे ?

खरे संत सतत ईश्‍वरी अनुसंधानात असतात. त्यांचा अहं अत्यल्प असतो. त्यांच्या साधनेमुळे त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झालेले असून त्यांच्याकडून ते वातावरणात प्रक्षेपित होते. ते सतत शिकण्याच्या स्थितीत असून सहजभावात असतात. ही सर्व वैशिष्ट्ये सनातनच्या संतांमध्ये, तसेच समाजातील खर्‍या संतांमध्ये आढळतात. त्यामुळे ते समाजाला साधनेसंदर्भात योग्य मार्गदर्शन करतात. योग्य साधना केल्याने व्यक्तीमध्ये सूक्ष्मातील स्पंदने कळण्याची क्षमता निर्माण होते. यामुळे खर्‍या संतांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य व्यक्तीला जाणवते, तसेच त्यांच्या संदर्भात चांगल्या अनुभूतीही येतात.

४. जिज्ञासूंनो, योग्य मार्गदर्शनानुसार साधना करून नरजन्माचे सार्थक करून घ्या !

‘नामस्मरण करणे, ही कलियुगातील सहजसुलभ आणि सर्वोत्तम साधना आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. प्राथमिक टप्प्याच्या साधकाने स्वतःच्या कुलदेवीचा नामजप करावा. तसेच पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा. जशजशी साधकाची साधना वाढत जाईल, तसतशी त्याच्यामध्ये सूक्ष्मातील स्पंदने कळण्याची क्षमता विकसित होईल. योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने साधनेतील पुढील मार्गक्रमण केल्यास साधनेत प्रगती होईल. यासाठी आताच साधनेला आरंभ करा. (‘साधना कशी करावी ?’ याविषयी सनातनच्या ‘ऑनलाईन सत्संगा’त सनातनच्या संतांद्वारे मार्गदर्शन केले जाते. या सत्संगाचा लाभ घेऊन साधनेला त्वरित आरंभ करा.)

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ !

खंड १ : साधू-संतांचे महत्त्व आणि कार्य
खंड २ : भोंदू बाबांपासून सावधान ! (भोंदू साधू, संत व महाराज अन ्खोटे शंकराचार्य यांसह)
खंड ३ : भोंदू साधू, संत आणि महाराज (राज्यकर्त्यांचे तुष्टीकरण, संतांच्या कार्यक्रमांतील त्रुटी इत्यादी)
खंड ४ : भोंदू साधू-संतांमुळे होणारी धर्महानी (हिंदु धर्माविषयी अज्ञान असणे, राष्ट्र-धर्महानी न रोखणे इत्यादी)

इत्यादी ग्रंथांतही याविषयीची माहिती दिली आहे.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.१२.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक