परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी आंध्रप्रदेश येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. श्री. चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश

१ अ. ‘जेव्हा गुरुदेवांवर पुष्पवृष्टी होत होती आणि गुरुदेव समाधी अवस्थेत होते, तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी ‘नारायणाचे (भगवान विष्णूचे) दर्शन झाले.

श्री. चेतन गाडी

१ आ. गुरुदेवांवर होणारी पुष्पवृष्टी पहाण्यासाठी ‘ते दिव्य दृष्टी देत आहेत’, असे जाणवणे : जेव्हा मला समजले, ‘आज गुरुदेवांचा वाढदिवस आहे आणि ८० सहस्र ऋषीगण त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणार आहेत’, तेव्हा मला वाटले, ‘हा क्षण पहाण्यासाठी गुरुदेव माझ्या डोळ्यांना दिव्य दृष्टी देत आहेत.’ भक्त सुदाम्याला जेव्हा श्रीकृष्ण आपले आनंदस्वरूप दाखवतो, तेव्हा श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणतो, ‘‘मी माझे हे रूप कोट्यवधी वर्षांतून एकदा कधीतरी प्रकट करतो. आज हे दिव्य रूप पहाण्यासाठी समस्त देवता आणि ऋषीगण येथे उपस्थित आहेत. ‘तुलाही हे दृश्य पहाता यावे’, यासाठी मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो.’’ श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी प्रदान केल्यानंतर सुदाम्याला ते रूप पहायला मिळाले. याच प्रकारे ‘आज गुरुदेवांनी मला दिव्य दृष्टी प्रदान केली’, असे मला वाटले.

१ इ. गुरुदेवांचे गुणगान ऐकतांना जीवनात दुसरे काही मिळवण्याची माझी इच्छाच संपली. ‘गुरुदेवांचे गुणगान ऐकण्यासाठी त्यांनीच या कानात प्राण घालून माझ्यावर कृपा केली’, असे मला वाटले.

१ ई. ‘मला शेवटच्या श्‍वासापर्यंत गुरुचरणांची सेवा करायची आहे’, असे वाटले आणि त्यांच्या चरणांशी एकरूप होण्याची तीव्र तळमळ माझ्यात निर्माण झाली.

१ उ. हा भावसोहळा पाहून माझे मन निश्‍चिंत आणि तृप्त झाले.

१ ऊ. कृतज्ञता : या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याची संधी देणार्‍या परम दयाळू प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञतापुष्पे अर्पण करतो. ‘हे गुरुदेव, ‘आपणच माझ्याकडून हे सगळे लिहून घेतले’, याविषयी आपल्या चरणी कोटी कोटी नमन !’

२. सौ. आराधना चेतन गाडी, आंध्रप्रदेश

२ अ. गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या १५ दिवसांपूर्वीपासून त्यांची पुष्कळ आठवण येणे आणि भावाच्या स्थितीत रहाणे : ‘मागील १५ दिवसांपासून मला प.पू. गुरुदेवांची पुष्कळ आठवण येत होती. ‘मी लहान बालिका आहे आणि गुरुदेवांजवळ पळत जात आहे’, असे मला वाटत होते. मी पुष्कळ भावाच्या स्थितीत होते.

२ आ. सोहळ्यापूर्वी आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढणे आणि सोहळ्याविषयी कळल्यावर त्रास उणावणे : ज्या दिवशी गुरुदेवांचा वाढदिवस होता, त्या दिवशी माझा त्रास पुष्कळ वाढला होता. सकाळी ८.३० वाजता ‘आज काहीतरी कार्यक्रम आहे’, असे मला समजले आणि ‘आज काहीतरी कार्यक्रम असल्यामुळेच मला त्रास होत आहे’, असे वाटले अन् लगेचच माझे त्रास उणावू लागले.

२ इ. भावसोहळ्याच्या वेळी रामनाथी आश्रमात असल्याचे वाटणे : सकाळी ९ वाजता सोहळ्याला आरंभ होताच मला पुष्कळ आनंद झाला आणि मला ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे वाटले. आरंभी तर ‘मी स्वर्गलोकात आहे’, असे मला वाटत होते.

२ ई. कु. ॐ अक्षरा (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची कन्या) नृत्य करत होती आणि गुरुदेवांच्या चरणी पुष्प अर्पण करत होती. तेव्हा ‘मीही तसेच करत आहे’, असे मला जाणवले.

२ उ. ‘आकाशातून देवीदेवता गुरुदेवांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले. सोहळ्याच्या वेळी मी भावावस्थेत होते.

२ ऊ. गुुरुदेवांवर पुष्पवृष्टी होत असतांना ते शिवलिंगाच्या रूपात दिसत होते.

२ ए. गुरुदेवांच्या ठिकाणी शेषावरील विष्णूचे दर्शन होणे : कु. ॐ अक्षरा जेव्हा दुसर्‍यांदा नृत्य करू लागली, तेव्हा मला गुरुदेवांच्या ठिकाणी शेषावरील विष्णूचे दर्शन झाले. त्यानंतरही तीन दिवसांपर्यंत मला हे दृश्य दिसत होते.’ (मे २०१५)


बेंगळुरू येथे झालेल्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळी सौ. आराधना चेतन गाडी यांना आलेल्या अनुभूती

१. राक्षोघ्न यज्ञाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले तेथे सूक्ष्मातून आले असून साधनेत अनिष्ट शक्ती आणत असलेल्या अडथळ्यांना ते दूर करत आहेत’, असे वाटणे : ‘१२.५.२०१५ या दिवशी बेंगळुरू येथे गृहप्रवेश होता. त्या वेळी रात्री राक्षोघ्न यज्ञ झाला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले तेथे सूक्ष्मातून येऊन बसले आहेत आणि साधनेत अनिष्ट शक्ती आणत असलेल्या अडथळ्यांना दूर करत आहेत’, असे वाटत होते.

२. हवन चालू असतांना तेथे सप्तदेवता आणि अग्निदेवता दिसत होत्या.

३. हवन पूर्ण झाल्यानंतर माझे शरीर हलके वाटत होते.

४. गृहप्रवेशाच्या दिवशी ‘बालाजीच्या रूपातील गुरुदेवांच्या चरणांवर फुले वहात आहे’, असे वाटणे : १३.५.२०१५ या दिवशी गृहप्रवेशाच्या दिवशी मी बालाजी स्वामींची पूजा करत असतांना पुष्पे वहात होते. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या मला प्रत्यक्षात फुले अर्पण करण्याची संधी मिळाली नाही; पण आता मी बालाजीच्या रूपातील गुरुदेवांच्या चरणांवरच फुले वहात आहे.’

५. ‘हे घर गुरुदेवांचे असून या घराचा आश्रम होणार आहे’, असे वाटून भावजागृती होणे आणि मन निर्विचार होणे : ‘हे घर गुरुदेवांचे आहे आणि या घराचा आश्रम होणार आहे’, असा विचार माझ्या मनात येऊन माझी भावजागृती झाली आणि त्या वेळी माझे मन निर्विचार झाले. ‘ही अनुभूती केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच येत आहे’, असे मला तीव्रतेने वाटत होते.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक