देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वामी कमेश्‍वरपुरी (मध्यभागी)

हरिद्वार, ११ एप्रिल (वार्ता.) – प्रवचन आणि कथा यांच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिक माहिती न देता समाजाला धर्माच्या स्थितीविषयी माहिती देणे आवश्यक आहे. भाषा, वेशभूषा आणि भोजन यांमध्ये पालट झाल्यामुळे संस्कृती नष्ट होत आहे. चित्रपटांत हिंदु देवता आणि साधू यांची विटंबना होत असल्याने याविरुद्ध अन् आश्रम अन् तांडव वेब सिरीजला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटांत जाणीवपूर्वक असे वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश असतो. त्यामुळे देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायद्या’ची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन येथील सप्त सरोवर मार्गावरील ‘श्री तुलसी मानस मंदिर आणि आध्यात्मिक आनंद संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष स्वामी कमेश्‍वरपुरी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी कमेश्‍वरपुरी यांची भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

या वेळी स्वामीजींना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर आणि समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा उपस्थित होते.

धर्मकार्यासाठीच्या साहाय्यास मी सदैव सिद्ध ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे. कोणत्याही विषयावर कार्यक्रम ठेवायचा असेल, तर त्यासाठी मी सिद्ध आहे.